मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पत्रास कारण की...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व  विद्यापीठांना सूचित करावे - मुख्यमंत्री 

मुंबई : राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व  विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरून नियंत्रित होणाऱ्या काही संस्थांचा उल्लेख देखील केला आहे. यामध्ये  ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल इज्युकेशन, काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया, बार काऊंसिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स  एज्युकेशन, नॅशनल काऊंसिल फॉर  हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

मोठी बातमी - धारावीतील कोरोनाबाबत आनंदाची बातमी, धारावीचे कोरोना ग्रहण सुटू लागले

पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, कोविडच्या प्रादुर्भावामुळे  उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसमोर  अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. आपणास माहित आहेच की,  कोविडच्या सर्वाधिक केसेसची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, (मुंबई महानगरपालिका क्षेत्र),  पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद,  नागपूर, नाशिक, अकोला, पालघर सारख्या  मोठ्या शहरामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.  राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे2019-20  या वर्षाच्या अंतिम परिक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत.

सध्याचे वातावरण हे कोणत्याही परिक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणु प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परिक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, परिक्षा घेणारी ॲथोरटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारे आहे.

पत्रात मुख्यमंत्री  ठाकरे यांनी  दिनांक 16जून 2020 रोजी पंतप्रधानांशी साधलेल्या संवादाची आठवण करून देतांना म्हटले की, या व्हिडिओ कॉन्फरंसिगमध्येही मी आपल्याला अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करून राष्ट्रीय स्तरावरील  या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्वोच्च संस्थांनी एकसमान मार्गदर्शक सुचना निर्गमित कराव्यात, त्यासाठी आपण त्यांना निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती.

मोठी बातमी - कोरोना योद्ध्यांच्या कुटूंबियांच्या सुरक्षेसाठी कोणती योजना आखली? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडर संदर्भात युजीसीने लागू केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे राज्य तंतोतंत पालन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच अंतिम वर्षाच्या परिक्षा यापूर्वी  जुलै 2020 मध्ये घेण्याचे ठरवण्यात आले होते.  परंतू कोविडची  राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दिनांक 18 जून 2020 च्या बैठकीत व्यावसायिक तसेच  अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ ठरवतील त्या फॉर्म्यूल्यानुसार त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.  यावरही जे विद्यार्थी परिक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी जेंव्हा परिक्षा घेता येतील तेंव्हा त्या घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे राज्य शासनाने  व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना निर्देश देऊन   त्यास मान्यता देण्याचे निर्देश द्यावेत व तशा एकसमान सुचना विद्यापीठांसाठी निर्गमित कराव्यात अशी  मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे या पत्रान्वये केली आहे.

uddhav thackeray write letter to request PM Modi to not conduct final semester examination of the non professional and professional courses


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM write letter to request PM Modi to not conduct final semester examination