अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

अकरावीतील ऑनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. 1) जाहीर झाली होती. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत मुसळधार पावसामुळे पुन्हा एक दिवसाने वाढवण्यात आली आहे.

मुंबई - अकरावीतील ऑनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. 1) जाहीर झाली होती. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत मुसळधार पावसामुळे पुन्हा एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. नवीन मुदतीनुसार विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. 7) सायंकाळी पाचपर्यंत प्रवेश घेता येईल. यामुळे नऊ ऑगस्टला जाहीर होणारी विशेष गुणवत्ता यादी, परिणामी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील यादीत 50 हजार 636 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना दोन, तीन आणि पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीनपर्यंत संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेता येणार होता; परंतु शनिवारी (ता. 3) शहर आणि उपनगरांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत पोचता न आल्याने प्रवेशाची मुदत उद्यापर्यंत (सहा ऑगस्ट) वाढवण्यात आली. पण पुन्हा रविवारी (ता. 4) मुसळधार पाऊस झाल्याने आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आल्याने राज्य सरकारने शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. या पार्श्‍वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यास आणखी एक दिवसाची मुदत दिली आहे. 

शिक्षण उपसंचालक "नॉट रिचेबल' 
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक बिघडले आहे. याबाबत मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती देणे अपेक्षित होते. पावसातही काही विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोचले; परंतु प्रभारी उपसंचालक राजेंद्र अहिरे कार्यालयात नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना निराश होऊन परतावे लागले. प्रवेशाच्या वेळापत्रकाबाबत अहिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते "नॉट रिचेबल' होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: collage admission process will be delayed again