कर्जमाफीबद्दल कोर्टाने सांगायची गरज नाही- मुख्यमंत्री

ब्रह्मदेव चट्टे
बुधवार, 5 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आज (बुधवार) विधानसभेत दिली.

मुंबई : "तमिळनाडूचा कर्जमाफीचा विषय वेगळा आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची की नाही हे उच्च न्यायालयाने सांगण्याची गरज नाही," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या राज्याचे मॉडेल काय आहे हे तपासत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, "केंद्राने मदत दिली नाही, तर कर्जमाफी कशी करता येईल, ते पाहणार आहोत.' यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एकदा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचेही सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आज (बुधवार) विधानसभेत दिली. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांबाबत आमदार शंभूराजे देसाई यांनी आज प्रश्‍नोत्तराच्या तासाअगोदर कर्जमाफीची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले.

ते म्हणाले, "राज्यातील 31 लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत मी आजच उत्तर प्रदेशचे मॉडेल काय आहे, याची माहिती घेण्याबाबत अर्थ सचिवांना सांगितले आहे.'

यावेळी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडवत मुख्यमंत्री म्हणाले, "विरोधकांचा संघर्ष कशासाठी सुरू हे त्यांनाच माहीत आहे. याबाबत मी काहीही भाष्य करणार नाही. राज्य सरकार भाजप सेनेच्या आमदारांच्या मागणीशी सहमत असून मी ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.'

शेतकऱ्यांना काय सांगायचं?- आमदार शंभुराजे देसाई

मुंबई : गावाकडं गेल्यावर आम्हाला शेतऱ्यांना सांगता आलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करावी. शिवसेनेची कर्जमुक्तीची मागणी कायम असून यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे असा आग्रह शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी विधानसभेत केला. साताऱ्यातील दोन सख्या भांवड शेतकऱ्यांनी आत्महत्या केला असल्याचा संदर्भ देत शिवसेनेचे आमदार विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते.

शंभूराजे देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या तगाद्यावरून आत्महत्या केली. सरकार कर्जमाफी करेल अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे आम्ही गावाकडं गेलो की आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी देसाई यांनी केली होती.

यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सुभाष साबणे म्हणाले, शेतकरी संपावर चालयं मग काय धत्तुरा खायचा काय ? राज्यातील शेतकरी पेरा करायचा नाही असा ठराव पास करत आहे, हे गंभिर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे धोरण जाहिर करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे साबणे यांनी लावून धरली.

यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी गरज नाही असे सांगत भाजप आमदार प्रशांत बंब बोलायला उभे राहिले. यावरून विधानसभेत शिवसेनेचे आमदार अक्रमक होत बंब यांच्या जवळ जावून का नाही याचा जाब विचारू लागले. गोंधळ वाढल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गप्पं बसण्याचे आदेश दिले. यानंतर आमदार संजय कुटे म्हणाले, कर्जमाफीचा आग्रह सगळ्यांचाच असून गेला चार वर्षात संकटात आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायला पाहिजे. यापुर्वीचा कर्जमाफीचा अनुभव सगळ्यांना आहे. त्यामुळे पारदर्शिकपणे विभागवार माहिती घेत कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी आमदार संजय कुटे यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी आपले निवेदन करावे असा आग्रह शिवसेनेच्या आमदारांनी लावून धरली.

Web Title: Collection information about Famers load waiver : CM