'यादीत नाव नाही, आता कसं वाटतंय?' विद्यार्थ्यांनी काढले तावडेंना चिमटे!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

महाविद्यालयीन प्रवेशादरम्यान, चौथ्या यादीतही जर नाव आले नाही, तर विद्यार्थ्यांना कसे वाटत असेल? असे म्हणत सोशल मीडियावर तावडेंवर तोंडसुख घेतले जात आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजपच्या उमेदवारांच्या यादीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नाव प्रसिद्ध झाले नाही.

विद्यार्थ्यांचे नाव यादीत न आल्याचे दु:ख आज शिक्षणमंत्र्याना समजले असेल, चार याद्या प्रसिद्ध होऊन यादीत नाव न आल्यानंतर होणारा मानसिक त्रास आता शिक्षणमंत्री तावडेंना कळला असेल, अशा शब्दांत नेटकरी विद्यार्थ्यांनी तावडेंना चिमटे काढले आहेत. मंत्री महोदयांनी आता थेट मॅनेजमेंट कोट्यातूनच उमेदवारी मिळवावी, असे फटकारे शालजोडीतून लगावले आहेत. तर काहींनी उमेदवारी मिळविण्यात शिक्षणमंत्री नापास झाल्याचा डंका पिटला आहे. 

शिक्षण मंत्री असलेल्या पदवीवरून निर्माण झालेले वादळ, शालेय शिक्षण विभागातील कार्यपद्धतीवर असलेली नाराजी, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांकडून
होणारी दिरंगाई यांसारखी अनेक कारणे तावडेंना तिकीट नाकारण्यामागे असल्याची दबकी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

भाजपाने चार याद्या जाहीर करत 150 उमेदवार जाहीर केले, पण विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट केला आहे. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली. महाविद्यालयीन प्रवेशादरम्यान, चौथ्या यादीतही जर नाव आले नाही, तर विद्यार्थ्यांना कसे वाटत असेल? असे म्हणत सोशल मीडियावर तावडेंवर तोंडसुख घेतले जात आहे.

शालेय शिक्षण मंत्रालयाची धुरा हाती घेतल्यापासून तावडे यांच्या कारभारावर विद्यार्थी नाराज होते. प्रवेश प्रक्रियेतील दिरंगाई आणि एकूणच पद्धतीवरुन विद्यार्थी त्यांचा संताप सोशल मीडियावर व्यक्त करत होते. विद्यार्थी-पालकांच्या वारंवारच्या नाराजीमुळे विनोद तावडेंची उचलबांगडी करत आशिष शेलारांकडे शालेय शिक्षण मंत्रालय सोपविण्यात आले होते.

भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे तावडे आधीपासूनच प्रतीक्षा यादीत होते; परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनंतर त्यांचा पत्ता कट झाल्याचे जवळपास स्पष्टच झाले होते. चौथ्या आणि भाजपच्या शेवटच्या यादीतही स्थान न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरुन तावडेंना चांगलेच ट्रोल केले.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- सीएनजी वापरणाऱ्यांना खुशखबर ! दरात झाली कपात

- Vidhan Sabha 2019 : फोन आला अन् यड्रावकरांचा एबी फाॅर्म...

- Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात तीन जागांसाठी 30 उमेदवार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College students and netizens trolled Education Minister Vinod Tawde on Social Media