संपकऱ्यांनी विषय तुटेपर्यंत ताणू नये; शरद पवारांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

संपकऱ्यांनी विषय तुटेपर्यंत ताणू नये; पवारांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई : राज्यात विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या तीव्र संपावर रोज राजकीय बैठकी आणि चर्चेला उधाण येत असतांना, मधात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर विलीनीकरण शक्य नसल्याची प्रतिक्रिया ट्विटर, फेसबुक च्या माध्यमातून पोस्ट केली आहे. शिवाय संपकर्त्यांनी ताणावे पण तुटेपर्यंत ताणू नये असा इशाराही पवारांनी दिला आहे.

परिवहन मंत्र्यांनी मला सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यातील एक मागणी वगळता इतर सर्व प्रश्नांवर वाटाघाटी झालेल्या आहेत. मात्र विलीनीकरणाच्या प्रश्नावर एकमत झालेले नाही.

ज्या संस्थेत आपण कामाला लागलो, त्या संस्थेतून इतर ठिकाणी आपली नोकरी वर्ग करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. पण विलीनीकरणाचा मुद्दा आज प्रथमदर्शनी तरी योग्य आहे, असे मला वाटत नाही.

एसटीचा इतके दिवस संप सुरू आहे. त्यात न्यायालयाचाही निकाल येत आहे. तरीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेणे म्हणजे एकप्रकारे कामगारांचे नुकसान करण्याला मदतच करण्यासारखे आहे. म्हणून राज्य सरकार आणि एसटीच्या प्रातिनिधिक आणि अन्य संघटनांनी एकत्र बसून यातून मार्ग काढला पाहिजे. हा संप थांबला पाहिजे. नागरिकांच्या यातना वाढलेल्या आहेत. कार्तिकी एकादशीला शेकडो बस जात असतात.

हेही वाचा: रत्नागिरी : गणपतीपुळेला पर्यटकांची पसंती ‘विकेण्ड’ला

आज भाविकांना दर्शन घेण्यासाठी जाताना अडचणी निर्माण होत आहेत. गेली अनेक वर्षे अत्यंत सेवभावी वृत्तीने एसटीने काम केले, त्याबद्दल लोकांच्या मनात आस्था आहे. या आस्थेला कुठेतरी धक्का पोहचत आहे. ताणावे, पण तुटेपर्यंत ताणू नये, असे मला वाटत असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे.

loading image
go to top