राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हमरी-तुमरी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 जून 2019

लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.

मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली. 

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा व आगामी विधानसभेची तयारी यासाठी मराठवाडा विभागाची बैठक आज बोलावली होती. या वेळी परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे पुढे केली. गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे हे विद्यमान आमदार असतानाही सोशल मीडियातून राजेश विटेकर यांनी सीताराम घनदाट (मामा) यांच्या नावाला पसंती दिल्याचा प्रकार आज उघड झाला. यावरून केंद्रे व विटेकर यांच्यात पक्षकार्यालयातच शाब्दिक चकमक उडाली. केंद्रे यांच्या पुत्राने थेट विटेकर यांच्या अंगावर धावून जाण्याचे धाडस केल्याने दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. ‘राष्ट्रवादी’चे हे दोन्ही नेते परस्परांना भिडल्याने एकच गदारोळ उडाला. मधुसूदन केंद्रे हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे याचे नातेवाईक आहेत.

मात्र ते कट्टर मुंडेविरोधक म्हणून मानले जातात. २०१४ ला अत्यंत अटीतटीच्या लढतीत त्यांनी ‘राष्ट्रवादी’कडून विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजेश विटेकर यांच्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचा आरोप असून त्यामुळेच या दोघांमधील धुमसत्या वादाला पक्षकार्यालयासमोरच तोंड फुटल्याने सर्व नेते हवालदिल झाले आहेत.

मारामारी झाली नाही - पाटील
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशाप्रकारे कोणतीही मारामारी झाला नसल्याचा दावा केला. ‘‘नेत्यांमध्ये सर्वसामान्य मतभेद होतात तसे झाले असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अशाप्रकारे काही वाद होतच असतात. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असल्याने प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याची संधी पक्षाचे नेतृत्व देते,’’ असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in NCP Leaders Politics