Balasaheb Thorat : धंदेवाईक नेत्यांच्या विरोधात रोष दिसेल

काँग्रेस बदललेली नाही, माणसे बदलतात. पक्ष सोडून जाणारे किंवा काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा पक्षात येणारे असे संधीसाधू असतात. हे धंदेवाईक नेते, राजकारणी असतात.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal

काँग्रेस बदललेली नाही, माणसे बदलतात. पक्ष सोडून जाणारे किंवा काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा पक्षात येणारे असे संधीसाधू असतात. हे धंदेवाईक नेते, राजकारणी असतात. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच चक्रात इथून तिथे उड्या मारत असतात. अशा लोकांबाबत जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे, तो या निवडणुकीत व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही.

जागावाटपावरून सुरु असलेला ताण कमी झालेला नाही. चर्चा थांबली आहे का?

बाळासाहेब थोरात - पक्ष कोणताही असला तरी जागावाटप करताना अशाच प्रकारचा ताणतणाव असतोच. जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांत जे सुरु आहे, तेच महायुतीमध्येही दिसेल. निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. आपला पक्ष वाढवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. त्यातून मार्ग काढणे महत्त्वाचे असते. काही जागांबाबत प्रदेश काँग्रेसने आपली भूमिका, मत दिल्लीतील नेत्यांना कळवले आहे. वरिष्ठ त्यावर मार्ग काढणार आहेत.

जागा वाटप करताना ठाकरे गट अधिक आक्रमक भूमिकेत होता का?

- काँग्रेस पक्षाची आणि शिवसेनेची पण संस्कृती आहे. त्यानुसारच चर्चा करतो. आमचा मुद्दा ठामपणे मांडला. त्यांनीही त्यांच्या पद्धतीने चर्चा केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत सरकारमध्ये काम केल्याने त्यांच्या कामाची पद्धतही माहीत होती, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार असल्याने त्यांनी तिन्ही पक्षांना योग्यरित्या सांभाळून घेतले आहे.

महाराष्ट्रातील जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेस बॅकफूटवर होती का?

- ही सार्वत्रिक निवडणूक ऐतिहासिक असणार आहे. देशात ‘इंडिया’ आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी असण्याची आवश्यकता ही अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा काळाची ती गरज आहे. घटनेच्या रक्षणासाठी, लोकशाहीसाठी ही आघाडी आहे. त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात सर्वत्र काँग्रेसने तडजोड केलेली आहे. काँग्रेसला ‘ईडी’, प्राप्तिकर खात्यापासून सर्वच पातळीवर त्रास दिला जात आहे. देशाच्या भवितव्यासाठी काँग्रेस संघर्ष करत आहे. लोकशाही टिकवण्यासाठी कमीपणा घेऊन काँग्रेस लढत आहे.

‘भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळाला?

- भारत जोडो यात्रेला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातला प्रतिसाद खूप उत्स्फूर्त आणि वेगळा होता. ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘भारत जोडो न्याय यात्रा’ या दोन्ही वेळेस काँग्रेस नेते राहुल गांधींची महाराष्ट्रात सभा झाली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रतिसादाविषयी राहुल गांधींचे यांचे विशेष लक्ष होते. महाराष्ट्र हे

संतांचे, समाजसुधारकांचे आणि घटनाकारांचे राज्य आहे. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, नामदेवांची ही भूमी आहे. महाराष्ट्राला पुरोगामी ही बिरुदावली संत आणि समाजसुधारकांच्या विचारधारेतून लाभलेली आहे. संतांचे आणि राज्यघटनेचे जे तत्वज्ञान आहे तीच काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रतिसादात राहुल गांधींना वेगळे प्रेम जाणवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शेगाव, नंदुरबारमध्ये मिळालेला प्रतिसाद विलक्षण होता. गांधी घराण्यावर लोकांचे असलेले प्रेम या सभांमधून दिसले.

तरीही राज्यात काँग्रेस अडचणीत असल्यासारखे दिसते...

- काँग्रेस पक्ष म्हणून अडचणीत आलेला नाही. एकूणच पुरोगामी तत्वज्ञान, राज्यघटना अडचणीत आली आहे. भाजपने समाजात कट्टरतेचा प्रसार केला आहे. एखादा झेंडा घेऊन समाजासमाजात द्वेष निर्माण करणे फार सोपे काम आहे. काँग्रेसचे तत्वज्ञान सर्वांना बरोबर घेऊन जाणारे समतावादी आहे. माणसामाणसाला जोडणारी काँग्रेस आहे. आमचा मार्ग अवघड आहे, पण शाश्वत आहे. देशात सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेमध्ये राहिलेली आहे.

काँग्रेसचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोचवण्यात तुम्ही कमी पडलात का ?

- काँग्रेस जनतेच्या हिताची कामे करत राहिली. फार दूर नको जाऊया. २००४ आणि २००९ मध्ये आमच्या यूपीए सरकारने मनरेगा, अन्न सुरक्षा अधिकार, माहितीचा अधिकार, आधारकार्ड

सारख्या गोष्टी देशाला दिल्या. पण काँग्रेस सर्वसमावेशकतेचे तत्वज्ञान देशातील लोकांपर्यंत पोचवण्यात कमी पडले. सत्तेमध्ये असताना किंवा नसतानाही मुलांसाठी शिबिर घेणे, कार्यकर्त्यांची फळी उभा करण्यात कमी पडलो. पक्षाची ही नव्याने बांधणी करावीच लागेल. ‘भारत जोडो यात्रा’ ही त्यासाठीच फार उपयोगी पडणार आहे. राहुल गांधी सत्तेपेक्षा विचारधारेवर भर देतात, ज्याचा फायदा काँग्रेसला बळकट करण्यासाठी होईल.

काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही...

- एखादी व्यक्ती पक्षातून गेल्याने फरक पडत नाही. राज्यात १९८० मध्ये काँग्रेस फुटली, त्यानंतर बॅरिस्टर अंतुलेंना काँग्रेसने मुख्यमंत्री केले, १९९९ मध्ये पक्षातले सर्व मोठे नेते बाहेर पडले, त्यानंतर सत्ता आल्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख झाले. २०१९ मध्येही पक्षातून खूप लोकं बाहेर पडली. पण जेव्हा असे मोठे नेते बाहेर पडतात तेव्हा तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळते.

काँग्रेसने अनेकांना मोठे केलं, सत्ता दिली. पण कारखाने, शिक्षणसंस्था आणि राजकारण या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र आमदारकी, खासदारकी आणि मंत्रिपदे ही जनतेची आणि जनतेसाठी असतात. काँग्रेस बदललेली नाही, माणसे बदलतात. पक्ष सोडून जाणारे किंवा काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा पक्षात येणारे असे संधीसाधू असतात. अशा राजकारण्यांबाबत, लोकांबाबत जनेतच्या मनात रोष आहे आणि तो व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com