खातेवाटपात नाराजीनाट्य; काँग्रेसच्या 'या' खात्यांच्या मागणीने तिढा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

सध्या कृषी खाते शिवसेनेकडे तर ग्रामविकास राष्ट्रवादीकडे आहे. सत्तावाटपात मंत्रिपदाचा पेच सुटलेला असला तरी खातेवाटपाचा तिढा मात्र कायम असल्याचे हे चिन्ह आहे. 

मुंबई : महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आता खातेवाटपावरून नाराजीनाट्य रंगण्याचे संकेत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये खातेवाटपाचे सूत्र ठरलेले असले तरी काँग्रेसने आज अचानक कृषी अथवा ग्रामविकास यापैकी एखादे खाते मिळावे, अशी इच्छा व्यक्‍त केली आहे. काँग्रेसच्या या नव्या मागणीने खातेवाटपाचा तिढा लगेचच सुटण्याचे चिन्हे नाहीत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आज दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. काँग्रेसकडे येणाऱ्या खात्यांबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली. त्या वेळी जनतेशी थेट जोडणारे विभाग काँग्रेसकडे आले नसल्याची नाराजी पक्षश्रेष्ठींनी व्यक्‍त केल्याचे समजते. जनाधार जोडता येईल असे विभाग काँग्रेसकडे असावेत, असा सूर या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी लावला. त्यामुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व प्रभारी मल्लिकार्जून खर्गे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. 

HappyBirthdayNanaPatekar : नाना, अभिनयाची भूक कायम ठेव! 

सध्या कृषी खाते शिवसेनेकडे तर ग्रामविकास राष्ट्रवादीकडे आहे. सत्तावाटपात मंत्रिपदाचा पेच सुटलेला असला तरी खातेवाटपाचा तिढा मात्र कायम असल्याचे हे चिन्ह आहे. 

जाहिरातीतही काँग्रेस नाही 
महाविकास आघाडी सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. या निर्णयाच्या जाहिरातीमधे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे छायाचित्र छापण्यात येईल. त्यामुळे या निर्णयात काँग्रेसची छाप दिसणार नाही. अशी नाराजी काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्‍त केली. त्यामुळे, कृषी खाते काँग्रेसकडे असावे. अन्यथा ग्रामविकास खाते तरी मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे कृषी अथवा ग्रामविकास विभागासाठी आग्रह धरतील असे काँग्रेसच्या नेत्यांची स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress demands agriculture portfolio in Maharashtra government