नागपूरसाठी काँग्रेसला सापडेना उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली. मात्र पुणे, नागपूरसह एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या मतदारसंघांतील उमेदवारांचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक गुरुवारी रात्री पार पडली.  

अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. काँग्रेसने गेल्या वेळी २६ जागा लढविल्या होत्या. या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकच्या जागा मागितल्याने यंदा पक्षाच्या वाट्याला २५ जागा येतील, अशी शक्‍यता गृहीत धरून काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माणिकराव ठाकरे (यवतमाळ-वाशीम), मुकुल वासनिक (रामटेक), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई), खासदार राजीव सातव (हिंगोली), अमिता चव्हाण (नांदेड), चारुलता टोकस (वर्धा) यांच्या नावांची काँग्रेसच्या केंद्रीय समितीला शिफारस करण्यात आली आहे. यामुळे या नेत्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 

पुण्यात मोहन जोशी व अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असली तरी भाजपपासून फारकत घेणारे राज्यसभा खासदार संजय काकडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. नागपूर काँग्रेसमध्ये मोठया प्रमाणावर गटबाजी आहे. नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवार कोण असावा याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल. 

या पार्श्‍वभूमीवर नागपूरचा उमेदवार वरिष्ठ पातळीवर ठरविण्यात येईल. धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. लातूरमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याने शिवराज पाटील, शिवाजीराव निलंगेकर पाटील, अमित देशमुख यांनी एकत्र बसून उमेदवार निश्‍चित करावा, असा निर्णय घेण्यात आला. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडण्याची पक्षाची तयारी आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा ‘राष्ट्रवादी’ला
दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांचे एकमेव नाव आले आहे. दक्षिण-मध्य मुंबईत माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यात स्पर्धा असली, तरी गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. वायव्य मुंबई मतदारसंघात संजय निरुपम हे इच्छुक असले तरी कृपाशंकर सिंह यांचेही नाव यादीत आहे. उत्तर-मध्य मतदारसंघात प्रिया दत्त यांनी नकार दिल्याने माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. माजी मंत्री नसिम खान आणि कृपाशंकर सिंह यांच्या नावांचा उमेदवार यादीत समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ‘राष्ट्रवादी’ला सोडण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी नीलेश राणे यांचे नाव जाहीर केल्याने त्यांना पाठिंबा देण्याची आघाडीची रणनीती असेल असे सांगण्यात आले.

Web Title: congress doesnt find candidate in Nagpur constituency