मुंबई बुडवून दाखवली, हे शिवसेनेने मान्य करावे : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे! जनजीवन ठप्प झालंय. मात्र मुंबई कुठे तुंबली, असा प्रतिप्रश्न महापौर करतात. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक आहे.

मुंबई : उर्वरित मुंबई तर सोडाच पण खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाच्या आजुबाजुला कलानगरात प्रचंड पाणी साचलंय. तळमजल्यावर राहणारे लोक आपले किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवताहेत. किमान ते बघून तरी 'आम्ही मुंबई बुडवून दाखवली' हे मान्य करून शिवसेनेने जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबईसह उपनगरात आज (मंगळवार) जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरही पाणी साचले आहे. यावरून विरोधी पक्षांकडून महापालिकेच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे.
 
अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले आहे, की दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे! जनजीवन ठप्प झालंय. मात्र मुंबई कुठे तुंबली, असा प्रतिप्रश्न महापौर करतात. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक आहे. मालाड, कल्याण, पुण्यात भिंत कोसळून २५ बळी गेलेत. मुंबईत रस्ते वाहून गेलेत. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार कारणीभूत नाही का? कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना 'क्लीन चीट' देईल. पण त्याने गेलेले जीव परत येणार आहेत का?पुन्हा अशा घटना घडणार नाहीत,याची हमी मिळणार आहे का? मुंबईत ठिकठिकाणी स्थानिक व बाहेरगावचे प्रवासी अडकून पडले आहेत. मदत तर सोडाच पण रेल्वे केव्हा सुरळीत होईल, याची साधी माहितीसुद्धा त्यांना मिळत नाहीये. लोक प्रचंड हालापेष्टा सहन करताहेत. सरकारने युद्धस्तरावर उपाय करून हे लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचतील, यासाठी प्रयत्न करावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Ashok Chavan attack Shivsena on water logging in Mumbai