'बीजेपी से बेटी बचाओ' म्हणण्याची वेळ आली: अशोक चव्हाण

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

शेतकऱ्यांना शेतमाल मंत्रालयात आणून टाकण्याची वेळ आली असून, मंत्रालयातच आता बाजार सुरू झाला आहे. गरिबांची कामे होत नाहीत, अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. 

मुंबई : केंद्र आणि बहुतांश राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे "बीजेपी से बेटी बचाओ' म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केली. कॉंग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. 

देशात बलात्कारच्या घटनात वाढ झाली असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. पंतप्रधानांना यावर प्रतिक्रिया देण्यास जवळपास 11 ते 12 दिवस लागले. मुलींच्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांत भाजपचे पदाधिकारी आमदारच गुंतलेले आहेत. यामुळे "बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' यापेक्षा "बीजेपी से बेटी बचाओ' असे म्हणण्याची वेळ सामान्य माणसावर आलेली आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला. 

दादरच्या इंदू मिल जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मुद्यावर चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले, ""शिवसेना-भाजप सरकारने राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापरले. आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा होऊन तीन वर्षे झाली; मात्र, अद्याप काहीच काम झाले नाही.'' 

शेतकऱ्यांना शेतमाल मंत्रालयात आणून टाकण्याची वेळ आली असून, मंत्रालयातच आता बाजार सुरू झाला आहे. गरिबांची कामे होत नाहीत, अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. 

Web Title: Congress leader Ashok Chavan criticize BJP case on Rape cases