फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीबाबत बोलूच नये : थोरात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादवसारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न इंदिरा गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. तसेच राजकारणातील गुन्हेगारीबाबत बोलू नये, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी आणि करिम लाला यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून जोरदार वाद झाल्यानंतर संजय राऊत यांनी आपले विधान मागे घेतले आहे. त्यामुळे आता हा वाद मिटल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून, फडणवीस यांनाही लक्ष केले आहे.

इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा 'यू टर्न'; पाहा काय म्हणाले!

थोरात म्हणाले, की फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादवसारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये. ज्या करीम लालाबद्दल बोललं जात आहे, त्याच्यासकट हाजी मस्तान, युसुफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या इंदिराजींनी आवळल्या होत्या. इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. 1975 मध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.

तंगडं तोडण्याची भाषा इथं चालत नाही : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Balasaheb Thorat targets Devendra Fadnavis