esakal | बैठक काँग्रेसची; चर्चा शिवसेना, राष्ट्रवादींच्या नेत्यांची
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh sanjay raut

महाविकास आघाडीत समन्वयाची नितांत गरज असल्याचा सूर प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत उमटला. गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण, खासदार संजय राऊत यांची वक्तव्ये आणि टाळेबंदी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

बैठक काँग्रेसची; चर्चा शिवसेना, राष्ट्रवादींच्या नेत्यांची

sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई - महाविकास आघाडीत समन्वयाची नितांत गरज असल्याचा सूर प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत उमटला. गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण, खासदार संजय राऊत यांची वक्तव्ये आणि टाळेबंदी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला काँप्लेक्समधील एमसीए येथे ही बैठक पार पडली. प्रभारी एच. के. पाटील हे या बैठकीतील सर्व विषयाबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठीना अहवाल देतील.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे सात मंत्री उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुख प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाल्याची खंत व्यक्त करत यामधे अकारण काँग्रेसची देखील बदनामी झाल्याचे मत काही नेत्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रकारे अनिल देशमुख प्रकरण हाताळले ते सुरूवातीलाच झाले असते तर सरकारची बदनामी टाळता आली असती, अशी चर्चा झाली.

याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत सतत युपीएच्या अध्यक्षपदाबाबत वक्तव्य करत असून ही गंभीर बाब असल्याचे काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून सांगून राऊत यांची वक्तव्ये रोखावीत असेही, या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे वाचा - 'होय! आम्ही वर्षभरापासून रस्त्यावरच, आमची पुन्हा तयारी'; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर

शरद पवार यांना युपीएचे अध्यक्षपद द्यावे असे संजय राऊत यांची भूमिका आहे. यामुळे काँग्रेसमधे नाराजीचा सूर असून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावरच हे प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची भावना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमावरच काम व्हावे. त्यासाठी राजकीय विषय टाळावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांना करावी यावर या बैठकीत एकमत झाले.

हे वाचा - Corona Update: कोरोनाची आकडेवारी लॉकडाऊनची भीती वाढवणारी

लॉकडाउन नकोच
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची चिंता असली तरी लाॅकडाउन हा पर्याय नसून ते करू नये. यावरही काँग्रेसच्या या बैठकीत चर्चा झाली. सामान्य नागरिकांना लाॅकडाउनमध्ये अतोनात त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे लॉकडाउन टाळावे, अशी काँग्रेसची भूमिका मुख्यमंत्र्यांना कळवावी असे यावेळी ठरले.