काँग्रेस आमदार भारत भालकेंचा राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मराठा, धनगर, कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणा बाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना मेल वरुन पाठवले असून लवकरच मुंबईत जाऊन या संदर्भातील नियमानुसार असणारी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे भालके यांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. 

आमदार भालके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेल्या लेखी पत्रात असे नमूद केले आहे की, शाहु, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी  महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मराठा, धनगर, महादेव कोळी व मुस्लीम समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळावे ही मागणी वारंवार ते करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यासर्व समाजाला लेखी व तोंडी आरक्षण देण्याचे आश्‍वासन देऊन ही आजपावतो आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे या सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्यामुळे सध्या राज्यामध्ये आंदोलनाचा वणवा पेटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या सर्व समाजांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या पदावर राहण्यास नैतिकता वाटत नाही. म्हणून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे भालके यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. 

आपल्या राजीनामा पत्राची दखल घेऊन आपल्याला मुंबईला बोलवले जाईल त्यानंतर आपण मुंबईत जाऊन नियमानुसार राजीनामा देण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण करणार असल्याचे भालके यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान भालके यांच्या राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांना मिळताच शेकडो समर्थकांनी त्यांच्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालया बाहेर गर्दी केली.

Web Title: Congress MLA Bharat Bhalke resigns