काँग्रेसच्या आमदार शिवसेनेच्या गळाला? आता कोण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

आमदार निर्मला गावित यांना दुसऱ्या टर्ममध्ये मतदारसंघातील अनेक विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षाकडून निधी मिळण्यात आडकाठी आली. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधारी गटात जाण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. यापूर्वी त्यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारली.

नाशिक : काँग्रेसच्या इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या संपर्कात आहेत. सलग दोन वर्षे आमदार असलेल्या गावित यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेबरोबर रहावे, असा त्यांच्या निवडक समर्थकांचा कयास आहे. त्यामुळे त्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यांची राजकीय कोंडी केल्याने त्या निर्णयाप्रत आल्याने त्यांच्या या निर्णयाने पुन्हा शिवसेनेतील इच्छुकांचीच कोंडी होणार आहे. 

आमदार निर्मला गावित यांना दुसऱ्या टर्ममध्ये मतदारसंघातील अनेक विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षाकडून निधी मिळण्यात आडकाठी आली. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधारी गटात जाण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. यापूर्वी त्यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. इगतपुरी मतदारसंघात भाजपचा फारसा प्रभाव नाही. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे प्रवाहाबरोबर राहण्यासाठी त्या शिवसेनेत प्रवेशाची शक्‍यता आहे. त्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्काचे प्रयत्न आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता. मी मतदारसंघाच्या हितासाठी योग्य तोच निर्णय घेईन. अद्याप काहीही सांगता येणार नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी सांगतील त्याप्रमाणे होईल, अशी मोघम प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. 

आमदार निर्मला गावित यांच्या विरोधात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी गेले काही दिवस स्थानिक उमेदवार हवा, यासाठी मोठी मोहिम उघडली होती. यासंदर्भात गोपाळ लहामगे यांनी त्यांच्या विरोधात गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात आरोप करीत न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. माजी आमदार काशीनात मेंगाळ यांनी स्थानिक नेत्यानां बरोबर घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्यामुळे या घडामोडींना शह देण्यासाठी आमदार गावित यांनी शिवसेनेचा मार्ग अनुसरला आहे. सलग नऊ वेळा नंदुरबार मतदरासंघाचे खासदार राहिलेल्या व कॉंग्रेसच्या निष्टावंत गटातील माणिकराव गावित यांच्या निर्मला गावित कन्या आहेत. त्यांचे बंधु व नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी गेल्या महिन्यातच भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे गावित यांच्या प्रवेशाच्या घोषणा होणार की शिवसेनेतील विरोधामुळे त्यांचा प्रवेश अडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Nirmala Gavit may be entered Shivsena