Vidhan Sabha 2019 : देशातील तरुणांना चंद्राची नव्हे पोटाची काळजी : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नोटबंदी, जीएसटीमुळे गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांच्या खिशात टाकण्यात आला. उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास त्यांना तुरुंगात टाकण्यात येते. मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी कलम 370, चांद्रयानसारख्या गोष्टींचा गाजावाजा करण्यात आला.

औसा : भारतातील युवकाला उद्या काय होईल, याची माहिती नाही. आपल्या देशाने एक होऊन आतापर्यंत काम केले आहे, त्यामुळे आपण एक आहोत. जेवढे तुम्ही देशाला तोडण्याचे काम कराल, तेवढ्या समस्यांमध्ये वाढ होत राहणार. काँग्रेसची विचारधारा नागरिकांच्या हृदयात आहे. मुळ मुद्द्यांना बगल देण्यासाठीच सरकारकडून कलम 370, चांद्रयानसारख्या गोष्टींचा गाजावाजा केला जात आहे. युवकांना चंद्रावर जाण्यापेक्षा पोटाची काळजी जास्त आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

कैसे हे आप, असे म्हणत राहुल गांधींनी भाषणाची सुरवात केली. बेरोजगारी, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत आहे. भारतात आज कोणालाही विचारा जनतेचा प्रश्न काय आहे. यावर एका सेकंदात उत्तर मिळते, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची अवस्था. मोदींनी वाटोळे केले असे प्रत्येक शेतकरी म्हणत आहे. पण, माध्यमांमध्ये बेरोजगारी आणि शेतकऱ्यांविषयी एक शब्दही येत नाही, असे राहुल गांधी यांनी लातूरमधील औसा येथे बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. यानंतर राहुल कधीच माध्यमांसमोर किंवा सभेला संबोधित करताना दिसले नव्हते. आज पहिल्यांदा ते सभेत सहभागी झाले. मोदी सरकारवर जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले, की नोटबंदी, जीएसटीमुळे गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांच्या खिशात टाकण्यात आला. उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास त्यांना तुरुंगात टाकण्यात येते. मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी कलम 370, चांद्रयानसारख्या गोष्टींचा गाजावाजा करण्यात आला. छोटे व्यावसायिकांचा सत्यानाश झाला आहे. मोदी नागरिकांना सांगत आहेत चंद्राकडे बघा, तिकडे चालला आहे. इस्त्रोला उभारण्यासाठी अनेक वर्षे लागली आहेत, त्याचा फायदा मोदी घेत आहेत. चंद्रावर गेल्याने देशातील युवकांच्या पोटात अन्न जाणार नाही. आज तुम्ही कुठल्याही कंपनीत जाऊन विचारा, मेक इन इंडियाचे काय. मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत असतात, पण चिनी सैन्याच्या घुसखोरीबद्दल ते त्यांना विचारू शकतात का? माध्यमे आज मोदी सरकारची फक्त गुणगान गात आहेत. उद्योगपतींना 1 लाख 25 हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली, पण माध्यमांमध्ये एक शब्दही बोलला जात नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Rahul Gandhi campaign rally in Ausa for Maharashtra Vidhan Sabha 2019