काँग्रेसमध्येच अंतर्गत पेच; आता खातेवाटपाची घोषणा 'या' दिवशी शक्‍य 

Congress
Congress

मुंबई : महाविकास आघाडीच्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला असला, तरी आता कॉंग्रेस पक्षांतर्गत कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे याचा पेच कायम आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळण्यास विलंब होत असल्याने खातेवाटपाची घोषणा सोमवार (ता. 6) पर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. 

कॉंग्रेसने अधिकची खाती मिळावी, यासाठी खातेवाटपात खोडा घातला होता. कॉंग्रेसची मनधरणी करण्यासाठी त्यांना बंदरे, खार जमीन, खनिकर्म, पणन, मत्स्यपालन यापैकी तीन अधिकची देण्याची तयारी राष्ट्रवादी व शिवसेनेने दर्शविली होती. मात्र कृषी, जलसंपदा अथवा ग्रामविकास हे विभाग सोडण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. 
महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या खातेवाटपात प्रमुख खात्यांची विभागणी झाली होती. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी खातेवाटपाचा करार संमत करून त्यावर सह्या केल्या होत्या. मात्र, प्रमुख विभागांना जोडून असलेल्या पूरक विभागांचे वाटप झाले नव्हते. त्यावरूनच कॉंग्रेसने खातेवाटपात अधिक चर्चेची आवश्‍यकता असल्याची मागणी केल्याने खातेवाटप लांबणीवर पडले होते. 

विभागांच्या वाटपाचा आग्रह 
"परिवहन'ला जोडून बंदरे विकास हा विभाग येतो. तर, उद्योग व खनिकर्म, वने व खार जमीन, पशु व दुग्ध संवर्धन आणि मत्स्यपालन, सहकार व पणन असे काही विभाग एकत्रित आहेत. या जोडविभागांचे वाटप व्हावे, यासाठी कॉंग्रेसने आग्रह धरला होता. यापैकी बंदरे विकास, खार जमीन, पणन अथवा खनिकर्म हे विभाग कॉंग्रेसला मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. कॉंग्रेसला सुरुवातीला नऊ कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली होती. त्यामध्ये बदल करत दहा कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली आहेत, त्यामुळे अधिकचे एक महत्त्वाचे खाते मिळावे, यासाठी कॉंग्रेसने दावा केला होता. 

'ऊर्जा'साठी रस्सीखेच सुरू 
कॉंग्रेसने खातेवाटपावर सहमती दर्शविली असली तरी कॉंग्रेस अंतर्गतच आता खातेवाटपाचा पेच सुरू आहे. महसूल विभाग बाळासाहेब थोरात यांच्याकडे राहणार असून, सार्वजनिक बांधकाम माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात येणार आहे. मात्र, ऊर्जा विभागावरून कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ऊर्जा विभागासाठी विजय वडेट्‌टीवार यांनी आग्रह धरला असल्याचे सांगण्यात येते. हा विभाग कोणत्या मंत्र्याकडे द्यावा यावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नसून हायकमांडच्या निर्णयानंतरच कॉंग्रेसचे खातेवाटप पूर्ण होईल, असे सूत्रांचे मत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com