काँग्रेसकडून तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष - बाळासाहेब थोरात

Balasaheb-Thorat
Balasaheb-Thorat

पुणे - ‘काँग्रेस पक्षाची विचारधारा, तत्त्वज्ञान हे शाश्वत आहे. मात्र, आपण अनेक वर्षे सत्तेत असताना या तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष केले. पक्षसंघटनेकडेही कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे वातावरण चांगले असूनही आपण ते मतपेटीत परावर्तित करू शकलो नाही,’’ अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. यापुढे काँग्रेसचे तत्त्वज्ञान, विचारधारेसाठी पायाभूत काम करण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी मिशनरी पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ‘निर्धार’ कार्यशाळेत कार्यकर्त्यांशी थोरात बोलत होते. या वेळी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सोनल पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, राज्याचे सहप्रभारी वांशी रेड्डी, संपतकुमार, आशिष दुआ, बी. एम. संदीप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सत्यजित तांबे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी उपस्थित होते.

‘ग्रामीण भागात असे म्हणतात, की पीक चांगले आले असले तरी पोती भरतील तेव्हा खरे. कारण, पिकापासून पोती भरण्यापर्यंत अनेक प्रक्रिया कराव्या लागतात, असेच काहीसे काँग्रेसच्या बाबतीत झाले आहे,’’ असे सांगून थोरात म्हणाले, ‘‘नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेससाठी वातावरण चांगले होते, तरीही आपण जिंकू शकलो नाही. याचे कारण म्हणजे चांगल्या वातावरणात मतदारांचे मत मतपेटीत आणू शकलो नाही. त्यामुळे या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी फक्त बूथपर्यंत कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यापुरती मर्यादित नाही. मतदारांचे मत मतपेटीत आणण्यापर्यंत जबाबदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम केले, तर यश मिळतेच, हा अनुभव आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com