
"एका दिशाभ्रम आणि बुद्धीभ्रम झालेल्या…"; राज ठाकरेंच्या राहुल गांधींवरील टीकेला कॉंग्रेसचं प्रत्युत्तर
राज ठाकरेंनी आज गटाध्यक्षांच्या मेळाव्यात सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधानावरून राहुल गांधी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी राज ठाकरे यांनी राहुल गांधीं यांची सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का असा संतप्त सवाल देखील केला. दरम्यान यानंतर या टीकेला आता कॉंग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कॉंग्रेसचे नेते संचिन सावंत यांनी एक व्हिडिओ क्लिप ट्विट करत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिल आहे.
सचिन सावंत यांनी एका दिशाभ्रम आणि बुद्धीभ्रम झालेल्या व्यक्तीचे आक्रस्ताळा विलाप यापेक्षा वेगळी उपमा राज ठाकरेंच्या भाषणाला देता येणार नाही, असे म्हटले आहे. तसेच भाजपने मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे हे या भाषनानंतर सिद्ध झालं आहे अशी टीका केली आहे.
काही यंत्रणा कार्यरत आहेत जे मनसेचं कार्य विस्मृतीत जावं यासाठी काम करत आहेत असं राज ठाकरे म्हणाले होते. दरम्यान राज ठाकरेंच्या याच विधानावर बोलताना सावंत पुढे म्हणाले की, जनतेची स्मृती निर्धारीत करता येते हा जावई शोध राज ठाकरे लावत आहेत. गेल्या १६ वर्षांमध्ये त्यांनी बदललेल्या भूमिका जनतेला तर्कसंगत वाटत नाहीत याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा, याचं खापरं राज ठाकरे दुसऱ्यावरती, मीडियावर फोडत आहेत. एवढ्या दिवसात तुम्ही जेवढ्या भूमिका बदलल्या त्याबद्दल बुध्दिभ्रम होणं साजाजिक आहे असेही त्यांना म्हटलं.
ज्या पक्षाला जनतेला ब्लू प्रींट देता आली नाही ते स्टॅटर्जी बद्दल बोलतात यापेक्षा मोठा विरोधाभास असू शकत नाही. त्यामुळे ज्यांचा मेंदू भाजपकडे गहान आहे, त्यांनी राहूल गांधींच्या बुद्धीमत्तेवर आणि लायकीवर बोलावं यापेक्षा दुर्दैवी आणि हस्यास्पद असू शकत नाही असे सावंत म्हणाले. एकिकडे त्यांनी राज्यात प्रवक्ते जी भाषा बोलतात त्यामुळे राजकरणाचा स्तर खाली आला आहे, पण ज्या पध्दतीची भाषा राज ठाकरे यांनी वापरली त्यातून या प्रवक्त्यांचे मेरूमणी कोण असतील तर ते राज ठाकरे आहेत हे दिसून येतंय असेही सावंत यावेळी म्हणाले आहेत. राज ठाकरेंच्या भाषेचा निषेध देखील सावंत यांनी यावेळी केला.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्रतील राजकारणाचा दर्जा खालावत असल्याचे म्हटले होते. राजकीय पक्षांचे प्रवक्ते काहीही बोलतात. राज्यातील एक मंत्री महाराष्ट्रातील महिला नेत्यावर अभद्र शब्दांत टीका करतो. आजपर्यंत मी असा महाराष्ट्र कधीही पाहिला नाही, असेही राज म्हणाले. राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी महापुरुषांची बदनामी केली जात असून राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का. अशा शब्दात हल्ला चढवला, यावरून आता कॉंग्रेसने राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.