esakal | केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे या

बोलून बातमी शोधा

Modi_Shah

महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून मराठी माणसाला इंजेक्शन द्यायचे नाहीत हे बरोबर नाही. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाचे मोल लक्षात घेतले पाहिजे.

केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे या
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : ‘‘रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे जीव जात आहेत. ते वाचवणे आपली सर्वांची जबाबदारी असून यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील जनतेशी आपली बांधिलकी जपावी आणि केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे यावे,’’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (ता.२३) केले.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरण: आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक

महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून मराठी माणसाला इंजेक्शन द्यायचे नाहीत हे बरोबर नाही. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाचे मोल लक्षात घेतले पाहिजे. केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असताना गप्प बसून चालणार नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या परिस्थितीत फडणवीस यांनी राज्य सरकारबरोबर एकत्र येऊन महाराष्ट्राचा आवाज बनून केंद्र सरकारकडे भांडले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच औषधे, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे

महाराष्ट्राशी दुजाभाव

केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. दररोज ५० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची मागणी असताना केंद्र सरकारने फक्त २६ हजार देण्याला मान्यता देणे हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, अशी टीका पटोले यांनी केली. रेमडेसिव्हिरचा तुडवडा असताना त्याचा काळाबाजार करणाऱ्यांसाठी दोन्ही विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलिस स्थानकामध्ये जाऊन त्यांना सोडवून आणतात. एवढी तत्परता या विरोधी पक्षनेत्यांनी जनतेचे जीव वाचवण्यासाठी दाखवली असती तर राज्यातील जनतेला आनंदच झाला असता, असा टोला त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.