esakal | पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे

बोलून बातमी शोधा

Corona Lockdown

आंतरजिल्हा वाहतुकीवरील निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर ३२ ठिकाणी तपासणी करण्यास सुरवात केली आहे.

पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने नवे निर्बंध बुधवारी लागू केले आहेत. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनेही त्याबाबतचे आदेश गुरुवारी (ता.२२) प्रसिद्ध केले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात सुरू झाली आहे. २२ एप्रिल ते १ मे पर्यंतचे नेमके निर्बंध काय आहेत, याबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे.

- दुकानांच्या वेळा काय असतील

उत्तर - जीवनावश्यक वस्तूंची (किराणा, भाजीपाला, डेअरी, स्वीट मार्ट, चिकन -मटण, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची) दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील. शनिवार- रविवार कडक लॉकडॉउन असेल. त्या दिवशी फक्त दूध विक्री सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू असेल. औषधे आणि संबंधित वस्तूंची दुकाने सातही दिवस सुरू राहतील.

- आयटी, बॅंका, वित्तीय संस्था, इंटरनेट सेवा पुरवठादार यांची कार्यालये सुरू राहणार का?

उत्तर - सोमवार ते शुक्रवार दरम्यान यांची कार्यालये सुरू राहणार, १५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ कर्मचारी, या मनुष्यबळावर ती सुरू राहतील.

- घरेलू कामगार, ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस यांना कामावर जाता येणार का?

उत्तर - आठवड्याचे सातही दिवस त्यांना कामावर जाता येणार. मात्र महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन त्यांना करावे लागणार

- लसीकरणासाठी नागरिकांना जाता येणार का?

उत्तर - लसीकरणासाठी नागरिकांना जाता येईल.

- आंतरजिल्हा वाहतूक सुरू राहणार का?

उत्तर - अत्यावश्यक सेवेशी संबंधित, तातडीचे वैद्यकीय कारण, घरात दुखःद घटना (अंत्यसंस्कार) आदी कारणांसाठीच आंतरजिल्हा वाहतूक करता येणार. खासगी वाहनाने प्रवास करताना चालक आणि आसन क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी त्यात असतील. अन्य सर्व कारणांसाठीची वाहतूक बंद राहणार

हेही वाचा: Corona Update: कहर! सलग तिसऱ्या दिवशी ३ लाखाहून अधिक नवे रुग्ण

- एसटीने प्रवास करता येणार का?

उत्तर - प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीची वाहतूक सुरू राहणार

- रेल्वेने प्रवास करता येणार का?

उत्तर - प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येणार, त्यासाठी कन्फर्म तिकीट हवे. तसेच आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट जवळ असल्यास उत्तम. कारण प्रत्येक राज्याचे नियम वेगळे आहेत. तेथे तपासणी होऊ शकते. राज्यातंर्गतही रेल्वे स्थानकांवर तपासणी, चाचणी होणार आहे.

- विमान प्रवास करता येणार का?

उत्तर - विमान प्रवास करता येणार, मात्र त्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार

- खासगी प्रवासी बस वाहतूक सुरू राहणार का?

उत्तर - खासगी प्रवासी बस सुरू राहणार. मात्र, क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी त्यांना घेता येणार, तसेच त्यातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार, त्याचे शिक्के प्रवाशांना वाहतूकदारांनी मारायचे आहेत. तसेच एक किंवा दोन थांब्यांवरच त्यांनी थांबायचे आहे.

- एसटी, रेल्वे स्थानक, विमानतळापर्यंत प्रवाशांनी कसे जायचे?

उत्तर - रिक्षा, कॅब किंवा खासगी वाहनाने त्यांना तेथे जाता येईल. मात्र, जाताना प्रवासाचे तिकीट जवळ बाळगावे लागणार

- उद्योगांची मालवाहतूक सुरू राहणार का?

उत्तर - अत्यावश्यक सेवा, आयात- निर्यातीशी संबंधित उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यांची उत्पादने, कच्चा माल आदींसाठीची वाहतूक सुरू राहणार. त्यांच्या पुरवठादारांनाही वाहतूक करावी लागणार. मात्र, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचे पत्र संबंधित कंपनीकडून घेऊन वाहतूकदारांना ते जवळ बाळगावे लागणार

हेही वाचा: दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये २५ रुग्णांचा मृत्यू; राजधानीत ऑक्सिजनची आणीबाणी

- कामगारांना कामावर जाता येणार का?

उत्तर - कामगारांना त्यांच्या स्वतःच्या वाहनाने किंवा कंपनीच्या वाहनाने कामावर जाता येणार, (उदाः पुण्यातून भोसरी किंवा चाकण). त्यासाठी कंपनीच्या एचआरचे पत्र जवळ बाळगावे लागणार

- लोकल, पीएमपीची वाहतूक सुरू राहणार का?

उत्तर - लोकल, पीएमपीमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू राहणार. बाहेरगावाहून आलेले प्रवासी, लसीकरणाला जाणारे नागरिक आणि वैद्यकीय कारणास्तव नागरिक पीएमपीचा वापर करू शकतील.

- खाद्यपदार्थ पार्सल सेवा सुरू राहणार का?

उत्तर - सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान खाद्यपदार्थ पार्सल सेवा सुरू राहणार.

- ई-कॉमर्स, कुरिअर डिलिव्हरीचे काय?

उत्तर - ई- कॉमर्स, कुरिअर डिलिव्हरी बंद राहणार

- विवाह समारंभ करता येणार का?

उत्तर - विवाह समारंभाला जास्तीत जास्त २५ लोक उपस्थित राहू शकतील. त्यांना २ तासांत समारंभ संपविण्याचे बंधन असेल.

- अंत्यविधीसाठी किती लोक जाऊ शकतील?

उत्तर - अंत्यविधीसाठी जास्तीत २५ लोक उपस्थित राहू शकतील

- शासकीय कार्यालये सुरू राहणार का?

उत्तर - अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालये १५ टक्के मनुष्यबळावर सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील थेट कर्मचारी असल्यास त्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल.

हेही वाचा: कसली घाई होती? निधनाच्या अफवेवर सुमित्रा महाजन यांचा सवाल

आंतरजिल्हा वाहतुकीवर निर्बंध लागू

आंतरजिल्हा वाहतुकीवरील निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर ३२ ठिकाणी तपासणी करण्यास सुरवात केली आहे. राज्य सरकारच्या आदेशांनुसार वाहतुकीला परवानगी दिली जाणार आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मकही कारवाई होणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

रेल्वे स्थानकावर तपासणी सुरू

परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यास महापालिका प्रशासनाने बुधवारपासून प्रारंभ केला आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांची अॅन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. सर्व प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करताना खूप वेळ लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

या बाबत महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, रेल्वेतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी महापालिका एका शिफ्टमध्ये दोन कर्मचारी नियुक्त करीत आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. या कामासाठी रेल्वेनेही काही कर्मचारी द्यावेत, अशी मागणी केली आहे. परंतु, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे या बाबत संपर्क साधण्यात येईल. दरम्यान दोन दिवसांत रेल्वे स्थानकावर सुमारे १७०० प्रवाशांची तपासणी झाली आहे. त्यातील ४५ प्रवाशांची अॅन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. त्यातील दोन जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, असेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे

खासगी बस प्रवासी वाहतूक राहणार बंद

खासगी बस प्रवासी वाहतुकीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे पुण्यातील बस व्यावसायिकांनी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातून नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी विविध जिल्ह्यांत होणारी बस वाहतूक आता काही दिवस बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी दिली.

बसच्या क्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी वाहतूक, प्रवाशांच्या हातावर होमक्वारंटाईनचे शिक्के वाहतूकदारांनी मारायचे, बसच्या वेळापत्रकाची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यायची आदी निर्बंधांमुळे खासगी प्रवासी बससेवा बंद ठेवण्यात येणार आहे.