कॉंग्रेसची मानसिकता आजही आणीबाणीची - पंतप्रधान

कॉंग्रेसची मानसिकता आजही आणीबाणीची - पंतप्रधान

मुंबई - "न्यायसंस्थेला घाबरविण्यासाठी सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणणाऱ्या कॉंग्रेस पक्षाची मानसिकता आजही आणीबाणीच्या काळासारखीच आहे,' अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईत केली. लोकशाहीवरील निष्ठा मजबूत राखण्यासाठी आणीबाणीच्या इतिहासातील काळ्या अध्यायाचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

तत्कालीन कॉंग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीच्या काळ्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी भाजपने "1975 आपात्काल लोकतंत्र की अनिवार्यता, विकास मंत्र लोकतंत्र' या विषयावर आयोजित केलेल्या जनसंवादामध्ये प्रमुख संवादकर्ता या नात्याने मोदी बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे व कार्यक्रमाचे निमंत्रक मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, की 1975 मध्ये लादलेली आणीबाणी म्हणजे एखाद्या परिवारासाठी घटनेचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो याचे दुर्मिळ उदाहरण आहे. कॉंग्रेसने आणीबाणीत देशातील न्यायसंस्थेला भयभीत केले. एका परिवाराच्या सत्तासुखासाठी न्यायसंस्थेचे अवमूल्यन करून त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला. आणीबाणीच्या काळातील कॉंग्रेसची ही मानसिकता आजही कायम आहे. कॉंग्रेसने न्यायसंस्थेला धमकावण्यासाठी सरन्यायाधीशांविरोधात क्षुल्लक कारणांवरून महाभियोग दाखल केला. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. 

ते म्हणाले, की लोकशाहीबद्दलच्या आपल्या वचनबद्धतेचे आणि संविधानाबद्दलच्या समर्पित वृत्तीचे सातत्याने स्मरण करण्याची गरज आहे. लोकशाहीवरील आपली निष्ठा मजबूत राहावी यासाठी आणीबाणी, हा इतिहासातील काळा अध्याय कधीही विसरता कामा नये. सध्याच्या आणि पुढच्या पिढीला जागरूक करण्यासाठी आणीबाणी लादली त्या दिवसाचे आपण स्मरण करतो. 

धोका कॉंग्रेसचाच - फडणवीस 
फडणवीस म्हणाले, की कॉंग्रेसने आणीबाणी लादून देशातील लोकशाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला; पण जनता झुकली नाही. असंख्य कार्यकर्त्यांनी आणीबाणीविरोधात दिलेल्या लढ्याचा विजय म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा विजय आहे. त्या दिवसाचे स्मरण आवश्‍यक आहे. आज कॉंग्रेस पक्ष संविधान वाचविणार म्हणतो, पण देशाच्या संविधानाला सर्वाधिक धोका कॉंग्रेस व त्या पक्षाच्या साथीदारांचाच आहे. देशातील लोकशाही व संविधान संपविण्याचा प्रयत्न कोणी केला हे पुढच्या पिढीलाही समजण्याची गरज आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com