
Nana Patole : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचे षडयंत्र : नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भाजपमध्ये चढाओढच लागली आहे. मागील महिनाभरात भाजपच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे षडयंत्र जाणीवपूर्वक रचले आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे गुणगान गाण्याच्या नादात त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून महाराज आता जुने आदर्श झाले असून गडकरी नवे आदर्श आहेत, असे वक्तव्य करून महाराजांचा घोर अपमान केला.
त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली, असे निर्लज्ज वक्तव्य केले. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरीशी केली. तर आमदार प्रसाद लाड यांनी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा जावईशोध लावला. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. याआधी छिंदम नावाच्या भाजप नेत्यानेही असेच दिवे लावले होते. यामध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे हे सर्वजण भारतीय जनता पक्षाचेच आहेत.