कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे गरजेचे; 'आयएमए'चे मत

भाग्यश्री भुवड 
Wednesday, 19 August 2020

51 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या म्हणजे त्यांना कोरोना होऊन गेला आणि त्यांनी कोरोना तपासणीच केली नाही, असा अर्थ होतो.

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून रुग्णांचे निदान करणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रुग्णाच्या हायरिस्क आणि लोरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मुदत वाढली; आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घ्या

नुकतेच पुण्यात केलेल्या सिरो सर्वेक्षणामध्ये 51 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडी आढळून आल्या. त्यामुळे त्यांना कोरोना होऊन गेला, हे समजलेही नाही. मात्र, याचा अर्थ आपण 'हर्ड इम्युनिटी' जवळ आलो आहोत असा लावला जात असून तो तसा अजिबात घेऊ नये, असे आयएमएकडून स्पष्ट करण्यात आले. लक्षणे नसलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे, चाचण्या वाढवणे हे अत्यंत आवश्यक असून तसे होत नसल्यानेच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याचे आयएमएचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.  

CBI सर्वात आधी 'या' गोष्टी घेणार स्वतःच्या ताब्यात, आजच किंवा उद्या CBI ची टीम मुंबईत होणार दाखल

51 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या म्हणजे त्यांना कोरोना होऊन गेला आणि त्यांनी कोरोना तपासणीच केली नाही, असा अर्थ होतो. म्हणजेच लोकांच्या तपासण्या वाढवल्या पाहिजेत. याचा दुसरा अर्थ असाही होतो की हे 51 टक्के लोक पॉझिटीव्ह असताना उपचार न घेता किंवा क्वारंटाईन न होता कोरोना संसर्ग पसरवत होते. मध्यंतरी पुण्यात कोरोना पुन्हा वाढला होता. त्यामागे कोरोना तपासणी न केलेले लोक समाजात फिरत होते, त्यातून ही संख्या वाढण्यास मदत झाली. अशा लोकांच्या तपासण्या करून त्यांना अलगीकरण करणे किंवा क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. अन्यथा अशाने संसर्ग अधिक पसरू शकतो, अशी भीती यावेळी डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केली. 

तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु
 

लक्षणे नसलेली आणि पॉझिटिव्ह असलेली लोक कुणाच्या तरी संपर्कात आल्यानेच संसर्ग पसरत आहे. याचा अर्थ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे सिद्ध होत आहे. संशयितांच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत संपर्कात आलेल्या सर्वांच्या तपासण्या होणे आवश्यक आहे. म्हणून कंटेनमेंट झोनमधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे, चाचण्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. 
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र राज्य 

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to control corona outbreak contact tracing must be increase says ima