कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची माहितीच सरकारकडे नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Death

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची माहितीच सरकारकडे नाही

पुणे : कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू, असे आश्वासन राज्य सरकारने दिले. त्या संबंधीचे परिपत्रकही निर्गमित केले. मात्र आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला, याची आकडेवारीच सरकारकडे उपलब्ध नाही. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. यासंबंधी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी ही माहिती विद्यापीठांनी संकलित करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. (Corona Death Data Update)

स्टुडंट हेल्पींग हॅंड या संघटनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करण्यात आला होता. यामध्ये राज्यातील एकूण अर्जदारांची संख्या, लाभार्थी आणि जिल्हानिहाय लाभार्थ्यांची आकडेवारी मागण्यात आली. मात्र या विषयासंबंधी कोणताच अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे माहिती उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे विभागाने म्हटले आहे.

संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणतात, ‘‘कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांची सरकारडून हेटाळणीच झाली आहे. अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या संबंधी कोणतीच तक्रार आली नसल्याचे आम्हाला सांगितले. मात्र आम्ही स्वतः याबद्दल सर्वेक्षण करत असून, अनेक विद्यार्थ्यांनी यासंबंधी गुगल फॉर्म भरत माहिती दिली आहे.’’

हेही वाचा: नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंभोज यांनी नाचवली तलवार!

अनाथ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांचा कुठलीच माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. म्हणून आम्ही राज्यव्यापी सर्वेक्षण हाती घेतले आहे, अशा माहिती आंबेकर यांनी दिली. ते म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांच्या मूलभूत माहितीबरोबरच पालकांचे मृत्युप्रमाण पत्रही आम्ही गुगलफॉर्म द्वारे संकलित केले आहे. २२ फेब्रुवारी पर्यंत जमा झालेली माहिती मंत्री आणि उच्च शिक्षण विभागाला ई-मेल केली आहे. या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण मोफत व्हावे, तसेच वसतीगृह आणि इतर आर्थिक समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणणार आहे. पहिल्या टप्प्यात १०३ विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली आहे.’’

विद्यार्थ्यांना मदतीसाठीचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले होते. त्यामुळे कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठ स्तरावरच उपलब्ध होईल. या संबंधी विद्यापीठांनीही महाविद्यालयांकडून माहिती मिळवायला हवी.

- प्रकाश बच्छाव, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग

Web Title: Corona Death Patient Parent Loss Data Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..