स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभासाठी कोरोना योद्धे निमंत्रित 

प्रमोद बोडके
Monday, 10 August 2020

विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. ध्वजारोहण करणारे मंत्री/राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी वेळेवर न पोहोचल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करावे. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीत पार पडेल याची दक्षता घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या हस्ते उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहेत.

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन (15 ऑगस्ट) येत्या शनिवारी साजरा होणार आहे. यंदाच्या या समारंभावर कोरोनाच्या संसर्गाचे सावट असल्याने हा समारंभ सोशल डिस्टन्ससह कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून साजरा केला जाणार आहे. या समारंभामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांची पत्नी/ आई-वडील यांच्यासोबतच कोरोना योद्यांना (डॉक्‍टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह कोरोनामुक्त झालेले नागरिक) शासकीय समारंभात निमंत्रित केले जाणार आहे. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या समारंभाची सूचना व नियमावलीच आज प्रसिद्ध केली आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.05 मिनिटांनी आयोजित केला जाणार आहे. सकाळी 8:35 ते 09:35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करू नये अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे.

जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा 09:35 च्या नंतर आयोजित करावा अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात सकाळी 9.05 मिनिटांनी होणार आहे, राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजारोहण समारंभ होणार आहे. 

सर्वांसाठी मास्क बंधनकारक असून जास्तीत जास्त नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे "आत्मनिर्भर भारत' या घोषणेचा प्रसार करण्याची ही सूचना करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी वाद, विवाद स्पर्धा, देशभक्तिपर निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा आयोजित करण्यासही मुभा देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona warriors invited to Independence Day government ceremony