राज्यात कोरोनाचा कहर; आतापर्यंतचा आकडा 3 लाखांवर

रविराज गायकवाड
Sunday, 19 July 2020

महाराष्ट्रात रविवारी, 9 हजार 518 रुग्ण सापडले आहेत. एका दिवसांत इतके रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. या रुग्ण संख्येमुळं राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केलाय. राज्यात आतापर्यंत 3 लाख 10 हजार 455 रुग्ण सापडले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुणे, ठाणे, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आलाय. पुण्यातल्या लॉकडाउनचा पहिला टप्पाही झालाय. परंतु, कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतानाच दिसत आहे.

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात रविवारी, 9 हजार 518 रुग्ण सापडले आहेत. एका दिवसांत इतके रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. या रुग्ण संख्येमुळं राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केलाय. राज्यात आतापर्यंत 3 लाख 10 हजार 455 रुग्ण सापडले आहेत. त्यातील एक लाख 69 हजार रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, आतापर्यंत 11 हजार 854 रुग्णांचा कोरोनामुळं बळी गेलाय. एका दिवसात 9 हजारांवर रुग्ण सापडले असले तरी, रविवारी 3 हजार 906 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. 

मुंबईत पुन्हा रुग्ण
मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. रविवारी मुंबईत 1 हजार 46 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळं मुंबईत 64 जणांचा रविवारी मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत एक लाख 1 हजार 224 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात आतापर्यंत या रोगाने 5 हजारहून अधिक जणांचा बळी घेतलाय. सध्या मुंबईत 23 हजार 828 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आजच्या आकडेवारीमुळं एक लाख जणांना कोरोनाची लागण झालेले मुंबई देशातील एकमेव शहर ठरले आहे. 

धारावीत पुन्हा रुग्ण
मुंबईतील धारावी परिसरातील कोरोना रुग्णांची घटती संख्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कौतुकाचा विषय ठरला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही धारावीतील कामाचं कौतुक केलं होतं. पण आता धारावीत कोरोनाच्या नव्या 36 केस समोर आल्या आहेत. आतापर्यंत धारावीत 2 हजार 480 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिसरात एकूण साडे सहा लाख नागरिक राहतात. त्यातील 143 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra updates total patients crossed 3 lakh