देशाला पाणी सुरक्षा कायद्याची गरज - डॉ. राजेंद्र सिंह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

जमिनीतील पाणीसाठा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशाला दुष्काळ आणि पूर या दोन्ही दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक नागरिक त्यास जबाबदार आहे. देशाला पाणी बचतीची शिस्त लागावी यासाठी शासनाने पाणी सुरक्षा कायदा आणण्याची गरज आहे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

पुणे - जमिनीतील पाणीसाठा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशाला दुष्काळ आणि पूर या दोन्ही दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक नागरिक त्यास जबाबदार आहे. देशाला पाणी बचतीची शिस्त लागावी यासाठी शासनाने पाणी सुरक्षा कायदा आणण्याची गरज आहे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

‘सहयोग ट्रस्ट’ आणि ‘भारती विद्यापीठाचे विधी महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाण्यासाठी संबंध जगाला एकत्र आणणे’ याविषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. सिंह बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ॲड. असीम सरोदे, भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या विजया कुलकर्णी, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, दूरदर्शनचे अभियंता अधीर गडपाले या वेळी उपस्थित होते. ॲड. सरोदे यांनी संपादित केलेल्या ‘पाणी हक्क व कायदे’ या पुस्तकाचे डॉ. सिंह यांच्या हस्ते या वेळी प्रकाशन करण्यात आले. डॉ. सिंह म्हणाले, ‘‘पाणी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, त्याच्या स्रोतांचे जतन आणि संवर्धन करणे हे सरकारसह प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपणच आपल्याला पुरेशा जलसाठ्याची तरतूद केली पाहिजे. येणाऱ्या दहा वर्षातशून्य जलसाठा होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.’’ जलस्तर वृद्धीच्या उपाययोजना या वेळी डॉ. सिंह यांनी विद्यार्थ्यांना समजावूनसांगितल्या. ॲड. सरोदे म्हणाले, ‘‘पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पर्यावरणासाठी वागणूक आणि मानसिकता बदलणे गरजेचे आहे.’’पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना तरुण पिढीच्या सामाजिक जाणिवा जागृत होऊन त्यांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे, असे पाटेकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country needs water security law