डॉक्‍टरांनो, भीती वाटत असेल तर नोकरी सोडा: न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मारहाणीच्या कारणावरून डॉक्‍टरांनी पुकारलेल्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "मारहाणाची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा', अशा शब्दांत न्यायालयाने डॉक्‍टरांना खडसावले.

मुंबई : मारहाणीच्या कारणावरून डॉक्‍टरांनी पुकारलेल्या आंदोलनावर उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "मारहाणाची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा', अशा शब्दांत न्यायालयाने डॉक्‍टरांना खडसावले.

येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर सोमवारपासून मुंबईसह राज्यातील सर्व पालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा (मास बंद) घेतली. त्यामुळे राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांचे हाल झाले. डॉक्‍टरांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने डॉक्‍टरांना खडसावले. "मारहाणीची भीती वाटत असेल तर निवासी डॉक्‍टरांनी नोकरी सोडून द्यावी. हे वर्तन डॉक्‍टरी पेशाला काळिमा फासणारे आहे. जे डॉक्‍टर ऐकत नसतील त्यांची नावे आम्हाला सांगा.

जे निवासी डॉक्‍टर सुरक्षेशिवाय कामावर येत नाहीत त्या संबंधित हॉस्पिटलने निवासी डॉक्‍टरांना कायमचे सुट्टीवर पाठवायचे किंवा कामावरून काढून टाकायचे हे हॉस्पिटल प्रशासनाने ठरवावे', अशा शब्दांत न्यायालयाने डॉक्‍टरांना सुनावले आहे.

Web Title: Court insructions about doctors strike