COVID-19 vaccine: कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज

भाग्यश्री भुवड
Friday, 15 January 2021

राज्याला कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस आणि कोव्हॅक्सिन लशीचे 20,000 डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.

मुंबई: येत्या 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारनं कळवले आहे.

राज्याला कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस आणि कोव्हॅक्सिन लशीचे 20,000 डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.
भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे.

त्यामध्ये 4 वैद्यकिय महाविद्यालये आणि 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या लसीचे 2 डोस 4 आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री, AD Syringes तसेच AEFI Kit उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ही देण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा सुरु झाला असून सध्या पुरवठा करण्यात आलेल्या डोसेस नुसार 285 ठिकाणी व्हॅक्सीनेशन सेशनस आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्येक लाभार्थीला लसीचे 2 डोस 4 ते 6 आठवडयाच्या अंतराने देण्यात येणार आहे. 

हेही वाचा- संजय राऊत सहकुटुंब सिल्व्हर ओकवर, कौटुंबिक की राजकीय भेट? 

टप्प्याटप्याने केंद्र सरकारकडून नोंदणी केलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली लस पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी या लसीच्या 2 डोसने संरक्षित होणार आहेत.  यासाठी लसीचा साठा केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व सरकारी तसेच खाजगी डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचा-यांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

COVID 19 vaccine State ready for corona vaccination 16th January


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID 19 vaccine State ready for corona vaccination 16th January