गर्दी अन्‌ लांबची नोकरीही नको...

शर्मिला वाळुंज
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मी तुर्भे येथे कामाला जाते. सकाळी ठाण्यात उतरायचे आणि वाशीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी धावाधाव करायची. नोकरीचा नाही; परंतु रेल्वेचा बेभरवशाचा प्रवास आणि वाढत्या गर्दीचा कंटाळा आला आहे. यामुळे कमी पगाराचीही चालेल, परंतु मी डोंबिवलीत नोकरी शोधत आहे. 

- साधना ताम्हणकर, महिला प्रवासी, डोंबिवली. 

ठाणे : घरातली कामे लगबगीने आवरून धावतपळत स्टेशन गाठा. स्टेशनवर गर्दीचा लोंढा पाहून अर्धे अवसान तेथेच गळते. लोंबकळत कशीबशी लोकल पकडा. त्यातही अनेकदा लोकलच्या उशिरामुळे लेटमार्क. त्यामुळे कापला जाणारा पगार आणि चार शब्द ऐकावे लागणार हे वेगळेच... यापेक्षा राहणाऱ्या ठिकाणीच नोकरी करून चार पैसे कमी का होईना, पण ही गर्दी नको आणि तापही नको, अशी विचारसरणी अलीकडे महिलांची होऊ लागली आहे. काही महिलांनी स्थानिक ठिकाणी नोकरीची शोधाशोधही सुरू केली असून, डोंबिवली, ठाणे आदी शहरांत नोकरी करण्यास महिला प्राधान्य देऊ लागल्या आहेत.

कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, ठाणे येथून मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. मध्यंतरी रेल्वेच्या लेटलतिफ कारभाराचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला. लोकलची गर्दीही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अंबरनाथ, बदलापूर येथूनच गाडी पूर्णतः भरून येते. डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा परिसरांतील नागरिकांना गाडीत चढण्यासाठी जागाच उरत नाही. त्यातच महिला डब्यांची कमी संख्या, वाढती गर्दी यामुळे दररोज भांडणे तर होतातच. अनेकदा गर्दीत चढताना पडण्या-धडण्याच्याही घटना घडतात. त्यामुळे लांब ठिकाणी नोकरी करण्याचा त्रास वाढला असून, हा मनस्ताप टाळण्यासाठी आता स्थानिक ठिकाणीच नोकरी शोधण्याचा प्रयत्न महिला करीत आहेत. 

दादरपर्यंत उभे राहून जावे लागते. त्यामुळे महिला डब्यात नेहमी भांडणे होतात. त्यापेक्षा ठाण्यात नोकरी करण्याचा विचार करत आहे. 

- जयश्री घाडगे, महिला प्रवासी, मुंब्रा 

लोकलचा प्रवास नकोच 

आमच्याकडे महिला नोकरीच्या चौकशीसाठी येतात. त्या वेळेस प्रथम ठाणे किंवा आसपास नोकरी असण्यास प्राधान्य देत आहेत. लोकलचा प्रवास नको असल्याची कारणे अनेक जणी देतात.

अर्थात, त्यांच्या प्रोफाइलनुसार काहींना ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी नोकरीच्या संधी नाहीत; परंतु खासगी कार्यालय, दुकान, मॉल येथे काम करणाऱ्या महिलांचे स्थानिक नोकरीला प्राधान्य आहे. कामाचे जादा तास, तेथील ताणतणाव आणि प्रवासाची दगदग सहन होत नसल्याने त्या स्थानिक ठिकाणी नोकरी शोधतात, असे डोंबिवलीत जॉब प्लेसमेंट चालविणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

Web Title: the crowd and the long job