esakal | NCBनं मुक्त केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधीत व्यक्तीही - फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

fadnvis

NCBनं मुक्त केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधीत व्यक्तीही - फडणवीस

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणी मंत्री नवाब मलिक सातत्याने नवनवे खुलासे करत आहेत. यामध्ये त्यांनी भाजपलाही टार्गेट केलं आहे. एनसीबीनं सोडलेल्या लोकांमध्ये भाजपशी संबंधित लोक असल्याचा नवा खुलासा त्यांनी आज केला. त्यांच्या या आरोपाला आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एनसीबीनं झडतीनंतर ज्या लोकांना सोडून दिलं त्यामध्ये राष्ट्रवादीशीसंबंधीत एका व्यक्तीचा समावेश होता, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

हेही वाचा: CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांचं समन्स

फडणवीस म्हणाले, एनसीबीनं अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की, ज्यांना एनसीबीचे अधिकारी घेऊन गेले आणि नंतर त्यांची झडती घेण्यात आली, यामध्ये ज्यांच्याकडे काहीही आढळून आलं नाही त्यामुळं त्यांना सोडून देण्यात आलं. तसंच ज्या लोकांकडे काही मिळालं किंवा त्यांच्या फोनच्या मेसेजेसमध्ये काही आढळून आलं त्यांना अटक करण्यात आली. ज्या लोकांना सोडण्यात आलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या मुलाशी संबंधीत व्यक्तीचाही समावेश आहे. पण आम्ही यासाठी त्यांचं नाव घेत नाही कारण त्यांच्याकडे काही आढळलेलं नाही. त्यामुळे त्यांचं नाव घेऊन आम्ही त्यांना बदनाम करणार नाही. म्हणून मला असं वाटतं की, यावर राजकारण होता कामा नये.

ड्रग्जची महामारी मुलांना बिघडवणारी

आपल्या मुलांना बिघडवणारी ही ड्रग्जची महामारी आहे. याविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. नवाब मलिकांचं दुखणं वेगळं आहे हे मी यापूर्वीही सांगितलं आहे, त्यामुळं मी त्यांच्याबाबत अधिक काही बोलणार नाही, असंही माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केलं.

इन्कम टॅक्स विभागाचे छापे पवार कुटुंबांविरोधात नाहीत

फडणवीस म्हणाले, "दोन प्रकारचे छापे इन्कम टॅक्स विभागानं टाकलेत. त्यातच्या पहिल्या छाप्याच्या संदर्भात त्यांनी प्रेसनोट काढून माहिती दिली जी जास्त गंभीर आहे. कारण यामध्ये १,०५० कोटी रुपयांची दलाली घेण्यात आली असून याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये बदल्या, टेंडर्स यांचा समावेश आहे. यामध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने हा महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. एजन्सी याबाबत अधिक खुलासा करेल त्यावेळेस हे अधिक विस्तारानं कळू शकेल. अशा प्रकारे मोठा पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरुप देणं हे चुकीचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या विक्रीच्या संदर्भात तक्रार होती अशा पाच साखर कारखान्यांवर काल-परवा ज्या रेड झाल्या. यामध्ये चौकशी झाली त्यातून विक्रीची प्रक्रिया चुकीची असून विकत घेताना जौ पेसा मिळाला तो चुकीच्या पद्धतीनं आल्याच दिसून आलं आहे. कारण लाचेच्या पैशावर टॅक्स भरुन तो पांढरा करता येत नाही, हा नियम आहे. या कारखान्यांच्या डायरेक्टर्सवर छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईचा पवार कुटुंबियांशी संबंध जोडणं चुकीचं आहे."

loading image
go to top