देशातील सध्याची स्थिती आणीबाणीसारखी- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

...जनता अद्दल घडविते
""आणीबाणीनंतर सन 1977 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. आणीबाणीचे जोरदार समर्थन करण्यात आले. सभांना चांगली गर्दी जमत होती. लोक बोलत नव्हते. निकाल लागला. लोकांनी सत्ता उलथून टाकली. चुकीच्या रस्त्याने जाणाऱ्यांना अद्दल घडविण्याचे काम जनता करत असते. सामान्य जनतेचे हाल करणाऱ्यांचे भविष्यात हाल होतात,'' असे पवार यांनी सांगितल्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.

मंचर : ""नोटाबंदीच्या निर्णयानंतर चांगले दिवस आल्याचे एका बाजूला सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. बॅंकेत असूनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. फार वेळ रांगेत उभे राहावे लागते. धनदांडगे रांगेत पाहावयास मिळत नाहीत. शेती व अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. जनतेचे हाल सुरू आहेत. सध्याची परिस्थिती आणीबाणीसारखी असल्याचे पाहावयास मिळते. यापुढे गप्प बसून चालणार नाही,'' असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

मंचर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा, वल्लभ बेनके, सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, अतुल बेनके, प्रतापराव वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, बाळासाहेब बेंडे, प्रकाश पवार, सचिन भोर, विवेक वळसे पाटील, विनायक तांबे, पांडुरंग पवार, सुषमा शिंदे उपस्थित होत्या.

पवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात पाहतो; पण सामान्य जनतेची बात त्यांच्या लक्षात येत नाही. 52 टक्‍के जनता शेती व्यवसायाशी संबंधित आहे. शेतीमालाचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.''

दिलीप वळसे पाटील म्हणाले, "आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूरच्या प्रगतीत पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच या भागात धरणे झाली आहेत. शेती, उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्था पुढे नेण्याचे काम त्यांनी केले आहे. ''
या वेळी देवदत्त निकम, विष्णू हिंगे, नीलेश थोरात यांची भाषणे झाली. शरद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

ईसकाळवरील यासंबंधीचा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

इंदिरापर्वाचे अनुकरण (शेखर गुप्ता)

ही तर आर्थिक आणीबाणीच...! (मनोज आवाळे)

Web Title: current situation is like emergency, claims sharad pawar