क्‍यार चक्रीवादळाची तीव्रता वाढणार

क्‍यार चक्रीवादळाची तीव्रता वाढणार

पुणे - कोकण किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘क्‍यार’ या चक्रीवादळाची तीव्रता पुढील दोन दिवसांमध्ये आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आली; पण त्याच वेळी हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकणार असल्याने त्याच्याबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाऊस ओसरणार असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

क्‍यार हे चक्रीवादळ येत्या ४८ तासांमध्ये अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. येत्या शनिवारपासून (ता. २६) हे चक्रीवादळ पश्‍चिमेकडे अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत. चक्रीवादळाबरोबरच बाष्पही ओढले जाऊन, राज्यातील पावसाचा जोरही ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र, किनाऱ्यालगत उंच लाटा उसळून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

या चक्रीवादळामुळे गोव्यासह सिंधुदुर्ग किनारपट्टीलगतच्या मालवण, वेंगुर्ला भागाला जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून, अजस्र लाटा किनारपट्टीला धडकत आहेत. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. किनारपट्टीलगत ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. शुक्रवारी या चक्रीवादळाचे केंद्र रत्नागिरीपासून २१० किलोमीटर, तर मुंबईपासून ३७० किलोमीटर नैॡत्य दिशेला होते.

हे चक्रीवादळ पुढील चोवीस तासांमध्ये तीव्र, तर त्यानंतरच्या बारा तासांमध्ये अतितीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे; पण त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या दिवाळीच्या आनंदावर पाऊस पडणार नसल्याचेही खात्याने सांगितले. हे चक्रीवादळ त्याच्याबरोबर बाष्प घेऊन जाणार असल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

किनाऱ्यालगत असलेल्या कोकण किनारपट्टी, गोवा आणि कर्नाटक राज्यात ढगांची दाटी झाली असून, या भागात जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या शनिवारपासून (ता. २६) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्‍यता आहे. कोकणासह राज्यात हलक्‍या पावसाचा अंदाज असून, नगर, पुणे, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

क्‍यार या चक्रीवादळाची तीव्रता आणखी तीव्र होणार आहे, तर ही प्रणाली हळूहळू ओमानच्या सलालाह किनाऱ्याकडे सरकत जाताना अतितीव्र होईल.
- डॉ. अनुपम काश्‍यपी,  हवामान शास्त्रज्ञ

हवामान अंदाज
शनिवार (ता. २६) ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्‍यता रविवार (ता. २७) ः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com