"वायू'मुळे मॉन्सूनवर परिणाम 

"वायू'मुळे मॉन्सूनवर परिणाम 

पुणे -  "वायू' चक्रीवादळाचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची हजेरी दोन दिवस लांबणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली. 

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पाडणार असून, मॉन्सून प्रवाहावर परिणाम झाल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन दोन दिवस लांबणार आहे. तर, वातावरणातील बाष्प ओढून घेतल्याने विदर्भ व मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी दिली. 

कोकण किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली आहे. समुद्रही खवळला असून, उंच लाट उसळत आहेत. दोन दिवस जोरदार वाऱ्यासह तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्‍यता आहे. वादळ उत्तरेकडे गेल्याने गुरुवारपासून उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढेल, तर मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल. 

शुक्रवारनंतर मॉन्सूनची प्रगती शक्‍य 
मॉन्सून केरळात यंदा आठवडाभर उशिराने 8 जूनला दाखल झाला. राज्यात कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता. 13) मॉन्सून पोचण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. चक्रीवादळ निवळून पुन्हा प्रवाह वाढण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारनंतर (ता. 14) मॉन्सूनची प्रगती होणार असून, त्यानंतर राज्यात आगमन होण्याची शक्‍यता असल्याचे डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com