जिथे राबती हात तिथे जलसंपदा...

Drought
Drought

दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा...

‘संस्कृती संवर्धन’
नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड जिल्ह्यातील जवळपास ३० गावांत वीस हजार हेक्‍टरवर जलसंधारणाची कामे केलीत. ती आज दुष्काळी स्थितीतही पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहेत. चार वर्षांत संस्थेने मराठवाड्यातील १०० संस्थांना एकत्रित करून जनसाथी दुष्काळ मंचाद्वारे जलसंधारणाची कामे केली. ७० लाख लिटर पाण्याची साठवण क्षमता निर्माण झाली. १०० शेतकऱ्यांना आणि सुमारे एक हजार एकर शेतीला फायदा होतोय. गतवर्षी २९ गाव तलावांतील गाळ काढल्याने हजारावर शेतकऱ्यांच्या अकराशेवर एकर जमिनीला लाभ झालाय. 

येनिकोणीत उपक्रम 
जलालखेडा (जि. नागपूर) -
 येनिकोणीचे (ता. नरखेड) सरपंच मनीष फुके यांनी शुद्धपाण्याची समस्या सोडवली आहे. पाणीपुरवठा विहिरीजवळ फिल्टर मीडिया विहीर बनवून त्यात नजीकच्या तलावामधून नालीद्वारे पाणी सोडले. फिल्टर मीडिया विहिरीत नैसर्गिकरीत्या पाणी शुद्ध झाल्यावर ते विहिरीखालील पाइपद्वारे पुरवठा विहिरीमध्ये सोडले. यासाठी जलशुद्धीकरण सयंत्रापेक्षा कमी खर्च आलाय. गावातील सांडपाणी फिल्टरमीडिया विहिरीत सोडून ते शुद्ध करून बगीचा फुलवलाय. जलशिवार योजनेतून चार बंधारे दुरुस्त केले, सुमारे ३.५ किलोमीटरचे नाला खोलीकरण केले. त्यामुळे गावातील दीडशेवर हेक्‍टर जमिनीवरील पिकांना फायदा होणार आहे. 

आदर्श जलसंधारणाचा
धुळे -
 तालुक्‍यात जवाहर कृतज्ञता ट्रस्ट, देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशन, पाणी फाउंडेशनतर्फे जलसंधारणाची चळवळ विस्तारत आहे. जवाहर ट्रस्टने पाच वर्षांत ६० गावांमधील बंधारे व नाल्यांचे खोलीकरण केले. पाणी फाउंडेशनद्वारे ४४ गावांमध्ये जलसंवर्धनाची कामे झालीत. या वर्षी सुमारे १२४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे होतील. शिरपूर तालुक्‍यात आमदार अमरिश पटेल यांच्यातर्फे जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न राबवलाय. नाला खोलीकरण, रुंदीकरणातून बंधाऱ्यांची मालिका साकारली आहे. २०० कामे पूर्ण झालीत. तालुका टॅंकरमुक्त झालाय. साक्री तालुक्‍यात अभियानांतर्गत ७३ गावांमध्ये कामे झालीत. गुप्ता फाउंडेशनमार्फत जलसंधारणाची १५६ कामे झालीत. 

लोकसहभाग अत्यल्प
रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत जलसंधारणाची कृषी, वने, लघू पाटबंधारे (जिल्हा परिषद), लघू सिंचन जलसंधारण, भूजल सर्वेक्षण आणि ग्रामीण पुरवठा या विभागांच्या योजनांनुसार सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे, बांध दुरुस्तीची कामे झालीत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १,८८५ वनराई बंधारे बांधलेत. २७ गाव तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. पालघर जिल्ह्यात जलसंधारणाची ९२ कामे मंजूर आहेत. गाळ काढण्याची ९२ पैकी ८५ कामे सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात जलसंधारणाची वर्षभरात १,१८६ कामे हाती घेतली, त्यापैकी ९८६ पूर्ण झालीत. तिन्ही जिल्ह्यांत भूजल पातळी घटूनही जलसंधारणात फारसा लोकसहभाग नाही.

सरकार, संस्थांचा पुढाकार
औरंगाबाद -
 अनुलोम संस्थेतर्फे जिल्ह्यात २५७ पाझर तलावांतील गाळ काढणे प्रस्तावित आहे. शंभर तलावातील गाळ काढण्यासाठीच्या यंत्रसामग्रीसाठी सरकारच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत डिझेल देण्यात येणार आहे. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेतर्फे गंगापूर तालुक्‍यातील काही गावांत नाला रुंदीकरण, खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे, सिमेंट बंधारे इत्यादी कामे सुरू आहेत. याशिवाय दुष्काळी स्थितीत फळबागा जगविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या सहकार्याने मोहीम हाती घेतली जाणार आहे.

बागायत फुलवली
सातारा -
 खडकाने भरलेली लालसर ओबडधोबड नेहमीच तहानलेली जमीन. पण या तहानलेल्या डोंगराळ खडकाला पाणी पाजणाऱ्या जाधववाडी (जि. सातारा) येथील रामचंद्र राजाराम जाधव या शेतकऱ्याची ही प्रेरणादायी कहाणी. त्यांनी डोंगर फोडून आले, टोमॅटो, ज्वारी यांसारख्या पिकांचे यशस्वी उत्पादन घेत दुष्काळातही नवा आदर्श निर्माण केलाय. जाधव यांनी दीड-दोन वर्षांत खडकाळ शेतजमीन मोठ्या हिमतीने पीकयोग्य केली. मोठे दगड काढून गाळाची शेकडो ट्रॅक्‍टर माती टाकली. विहीर खोदली. कूपनलिका घेतली. शेततळे खोदले. नव्याने तयार शेतीत एक-दीड एकर अशा लहान मोठ्या पट्ट्या तयार केल्या. तीन एकरात रोजगार हमी योजनेतून डाळिंब लावले. आले, टोमॅटोसारखे आंतरपीक घेतले. सध्या शेतात आले एक एकर, डाळिंब तीन एकर, टोमॅटो दोन एकर, हरभरा दोन व रब्बी ज्वारी एक एकर आहे. शेततळे पाण्याने भरलंय. टंचाई काळात त्यातील पाण्याचा वापर केला जातो. बहुतांश पिकांना पाण्यासाठी ठिंबक वापरलंय. रामचंद्र याची शेती संपताच डोंगर लागतो. तिकडे सर्वत्र कुसळे दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com