धोकादायक इमारतींमुळे वारकऱ्यांचा जीव धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

पंढरपूर शहरात सुमारे ११४ धोकादायक इमारती आहेत. संबंधित सर्व मालमत्ताधारकांना नगरपालिकेने नोटिसा दिल्या आहेत. यात्रा काळात भाविकांनी अशा धोकादायक इमारतीमध्ये राहू नये.
- सुनील वाळूजकर, उपमुख्याधिकारी, पंढरपूर

पंढरपूर - आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रा काळात लाखो भाविक पंढरीत विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी येतात.  बहुतांश वारकरी शहरातील मठ, मंदिर, धर्मशाळा आणि जुन्या वाड्यांमध्ये मुक्काम करतात. ऐन पावसाळ्यात आणि आषाढी वारी काळातच शहरातील तब्बल ११४ मठ आणि वाड्यांच्या इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

या धोकादायक इमारतींमुळे वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
आषाढी वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पंढरीत येऊ लागले आहेत. आषाढी वारीच्या निमित्ताने आतापासूनच शहरातील हॉटेल, भक्तनिवास, खासगी लॉजेसेस फुल्ल झाले आहेत. वारी काळात पंढरीत येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात असलेले जुने आणि जीर्ण झालेले मठ आणि खासगी वाड्यांमध्येच आश्रय घ्यावा लागतो. असे अनेक जुने वाडे धोकादायक झाले आहेत. अशा स्थितीतदेखील वारकरी आपला जीव मुठीत धरून राहतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous Building Warkari Danger