"दसरा मेळाव्यांचं राजकारण न करण्याचा राज ठाकरेंनी दिला होता CM शिंदेंना सल्ला, पण..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray, Eknath Shinde

"दसरा मेळाव्यांचं राजकारण न करण्याचा राज यांनी दिला होता CM शिंदेंना सल्ला, पण..."

मुंबई - दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने ठाकरे गटाला परवानी दिली. मात्र यावरून एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात अनेकदा वादविवाद झाले. या मुद्दावर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. मात्र आता याबाबत नवीन खुलासा झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दसरा मेळाव्यावरून राजकारण न करण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी आधीच दिला होता. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याविषयी खुलासा केला. (Raj Thackeray news in Marathi)

हेही वाचा: Guardian Minister: शिंदे सरकारमध्ये फडणवीसच 'किंग'; तब्बल सहा जिल्ह्याचं पालकत्व

प्रकाश महाजन म्हणाले की, दसरा मेळाव्याचा ज्यावेळी विषय निघाला तेव्हा पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत होत की, राज ठाकरेंनी मेळावा घ्यावा. याबाबत मीच राजसाहेबांशी बोललो. मात्र राजसाहेब म्हणाले की, वर्षानुवर्षे दसरा मेळावा स्वर्गीय बाळासाहेब आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे. या समीकरणात आपण जाणं म्हणजे कोतेपणाचे लक्षण ठरेल. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी उत्सुक नाही.

दरम्यान राज ठाकरे यांनी आधीच एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांनाच सांगितलं होतं की, दसरा मेळाव्याबाबतीत शिवाजीपार्कवरून राजकारण करू नये हे कोतेपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळे राज ठाकरेंनी दिलेला सल्ला किती योग्य होता, हे दिसून आलं. शिवाय राज ठाकरे यांचा बाळासाहेबांविषयी असलेला आदरही दिसून आल्याचं महाजन यांनी म्हटलं.

हेही वाचा: दसरा मेळाव्यात शिंदे पुत्राला मिळणार मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

दसरा मेळाव्याबाबत न्यायालयाचा निर्णय ठाकरे गटाकडे गेल्यामुळे लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळाली. नवसंजीवनी मिळाल्यासारखे शिवसैनिक आनंदोत्सव साजरा करत होते. अर्थात याचा उद्धव ठाकरेंना फायदाच झाल्याचं महाजन यांनी म्हटलं.

दरम्यान मुंबईत आता दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे होणार आहे. उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवतिर्थावर होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. मात्र कोणाचा मेळावा अधिक प्रभावी ठरतो, हे दसरा मेळाव्यानंतर स्पष्ट होणार आहे.