'एटीव्हीएम'वर तिकिटासाठी डेबिट कार्डची चाचणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीमुळे सरकारी यंत्रणांची वाटचाल कॅशलेस व्यवहाराकडे होत असताना रेल्वेनेही त्यांच्याशी स्पर्धा सुरू केली आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमने (क्रिस) "एटीव्हीएम' मशिनवर स्मार्ट कार्ड न वापरता डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे.

रेल्वेने स्मार्ट कार्ड, ई-वॉलेट व इतर कॅशलेस पर्यायांचा वापर आधीच सुरू केला आहे. आता त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी "एटीव्हीएम'वर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करून तिकीट काढता येईल का? त्याची चाचपणी करण्यात येत आहे. स्मार्ट कार्डला पर्याय निर्माण झाल्यास तिकीट खिडकीवरील रांगाही कमी होतील. "तिकिटाची ही पद्धत अजून चाचणीच्या टप्प्यात आहे. याबाबत स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास रेल्वे बोर्ड अंतिम निर्णय घेईल,' असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

"सीओव्हीटीएम'मध्ये नव्या नोटा
नोटा मागे घेण्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या "सीओव्हीटीएम'लाही बसला आहे. थेट नोटा मशिनमध्ये टाकल्यानंतर तिकीट मिळते. आता, पाचशे व एक हजारच्या जुन्या नोटा हे मशिन स्वीकारणार नाही. नव्या नोटांसाठी एटीएमप्रमाणे या मशिनमध्येही बदल करावे लागणार आहेत. या क्षेत्रात केवळ तीनच कंपन्या हे काम करत असल्याने बॅंकांच्या एटीएमला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे रेल्वेच्या सीओव्हीटीएममध्ये बदल करण्यास उशीर लागणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मध्य व पश्‍चिम रेल्वे स्थानकावर 180 मशिन आहेत.

Web Title: Debit card test on ATVM