Maharashtra TET Result
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर आदल्या दिवशी फुटला आणि ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली. पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे आता ‘टीईटी’ ऑनलाइन घेण्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, परीक्षेच्या दिवशीच काही तास आधी प्रश्नपत्रिका त्या केंद्रांवर ऑनलाइन पाठविण्याचाही पर्याय चर्चेत आला आहे. दोन्हीपैकी एका पर्यायावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
राज्यात अनेकदा दहावी-बारावीच्या परीक्षांपूर्वी विविध विषयांचे पेपर फुटले आहेत. यंदा ‘नीट’ आणि ‘टीईटी’चेही पेपर फुटले. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक केंद्रावर ऑनलाइन पाठविल्या जाणार आहेत. याशिवाय पुढील ‘नीट’ ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता ‘टीईटी’ची परीक्षादेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ऑनलाइन घेतली जाऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि अध्यक्ष यांच्या ऑनलाइन बैठका सुरू आहेत. आगामी ‘टीईटी’साठी उमेदवारांना पुन्हा शुल्क भरावे लागणार नाही. त्यांची परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन घ्यायची, यावर आठ दिवसांत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ऑनलाइन परीक्षा घेतल्यास निकालदेखील लवकर लावता येईल, असेही सांगण्यात आले.
आठ दिवसांत होईल अंतिम निर्णय
पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा काही दिवसांनी होईल. आगामी परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायची, अशा दोन्ही पर्यायांवर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा सुरू आहे. अजून ठोस निर्णय झाला नाही; पण पुढील आठ दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होईल.
- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पेपरफुटीमुळे यंदा एकदाच ‘टीईटी’
२०२६-२७ या वर्षातील पहिली शिक्षक पात्रता परीक्षा २८ जून रोजी होणार होती. मात्र, आदल्या दिवशीच पेपर फुटला आणि अचानक परीक्षा रद्द करावी लागली. आता परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची, त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई, वितरण, परीक्षेचे नियोजन, विद्यार्थ्यांना हॉल तिकिटांचे वाटप अशा सर्व प्रक्रियांसाठी किमान दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परीक्षेनंतर निकालासाठी किमान एक ते दीड महिना लागतो. या पार्श्वभूमीवर यंदा एकदाच ‘टीईटी’ होईल, अशी सद्यःस्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.