जगभरातील ज्ञानियांचा जागर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरममध्ये सहभागी सर्व तज्ज्ञांनी राज्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याचे मान्य केले आहे. सर्वांनी एकत्रित काम करून महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवूया.
- अभिजित पवार, संस्थापक अध्यक्ष, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन

मुंबई - जगभरात कार्यशील सरकार, प्रगतिशील उद्योग आणि समाजासाठी झटून काम करणाऱ्या चेंज मेकर्सची मांदियाळी मंगळवारी वरळीतील नेहरू सेंटरमध्ये डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या निमित्ताने दिसून आली. यानिमित्ताने जगभरातील प्रज्ञावंतांची ज्ञानाची देवघेव करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञानात क्रांतिकारक कामगिरी करणारे आपल्या माहितीचे अभिसरण येथे करतील, यातून त्याचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडेल. नेहरू सेंटरच्या भव्य सभागृहात दोन दिवस कल्पकता, सर्जनाची ही चर्चा रंगणार आहे.

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या (डीसीएफ) दोन दिवसांच्या परिषदेचे मंगळवारी नेहरू सेंटरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. डीसीएफचे संस्थापक आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभििजत पवार यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या उपस्थितांचे व दोन दिवसांच्या चर्चासत्रात मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ वक्त्यांचे स्वागत करून राज्यात डीसीएफद्वारे सुरू असलेल्या अनेक कामांचा आढावा घेतला. दोन दिवसांच्या या परिषदेचा हेतू तसेच विविध चर्चासत्रांची माहिती त्यांनी या वेळी दिली.

सामाजिक बदल घडविण्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फोरमसारख्या व्यासपीठाची गरज आहे. या फोरममध्ये समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन सामाजिक बदलासाठी केवळ संकल्पना न देता त्यावर कृती करणे आवश्यक आहे. या फोरममध्ये सामाजिक बदल कसा घडविता येईल, यासाठी रोडमॅप ठरवावा. जेणेकरून तो प्रत्यक्षात आणता येईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सकाळ माध्यम समूह तनिष्का, यिन यासारखे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. सामाजिक बदल होत असताना सर्व घटकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक घटकांचा विकास होणे आवश्यक आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
अभिजित पवार म्हणाले, की डिलिव्हरिंग चेंज फोरममध्ये सहभागी सर्व तज्ज्ञांनी राज्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याचे मान्य केले आहे. राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱया निवडक लोकांना फोरममध्ये सहभागी करून घेतले आहे. शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत नावाजलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर ‘तनिष्का फाऊंडेशन’, ‘यिन’ आणि महान राष्ट्र नेटवर्कचे सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. सर्वांनी एकत्रित काम करून महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडविण्याचा उद्देश यामागे आहे. हा फोरम केवळ चर्चाच घडविणार नाही, तर बदल घडविण्यासाठी सक्रिय काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्राला अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री लाभले आहेत. त्यांना विकासाची दृष्टी आहे आणि त्यासाठी प्रचंड कष्टाची त्यांची तयारी आहे. केंद्रात ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे काम सुरू आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

२१व्या शतकातील सामाजिक अभियांत्रिकीचे आंतरराष्ट्रीय शिक्षक या विषयावर डॉ. झिमरमन यांनी मार्गदर्शन केले. काही गट विविध क्षेत्रांत प्रगती करत असतात. एकमेकांवर विश्वास असलेले हे लोक जागतिक तसेच स्थानिक स्तरावर सर्व आव्हानांना तोंड देत सामाजिक अभियांत्रिकीचे काम करून लोकांमध्ये शाश्वत नाती निर्माण करत असतात, असा एक नवा मुद्दा डॉ. झिमरमन यांनी मांडला.  तुमचा स्टार्टअप उभारा, हे सांगताना असफ किंडलर यांनी छोट्या स्टार्ट अपना गुंतवणूकदारांकडे कसे जावे याबाबत माहिती दिली. स्नॅपद्वारे छोट्या व्यवसायांना तंत्रज्ञानाने सक्षम करण्याचा कानमंत्रही त्यांनी दिला. मस्केटीअरच्या माध्यमातून स्टार्ट अप गुंतवणूकदारांपर्यंत पोचण्याचे मार्ग शाऊल अविदाेव यांनी सांगितले. जागतिक कल्पनाविष्कारांना एकत्र जोडण्याचे काम युझी शिफर यांनी केले.

स्थानिक प्रश्न हे जागतिक असतात आणि जागतिक समस्यांवर स्थानिक प्रश्नांमधूनच मार्ग निघत असतात.
- डॉ. एरिक झिमरमॅन

मोबाईल मार्केटिंग आजच्या तरुणांची आवड बनली आहे, त्यामुळे लहान-मोठे उद्योजकही व्यवसायाला पसंती देतात.
- असाफ किंडलर

सर्वजण एकत्र येऊन  होतकरू नवउद्यमींना साह्य करू शकतो का व एकंदर व्यवसायवृद्दी करू शकतो का, या संकल्पनेतून सोसाची निर्मिती झाली.
- उझी शेफर

Web Title: Delivering Change Forum conference in mumbai