दारूबंदीसाठी दिलेली निवेदने कचरापेटीत! मुलाची दारू सोडण्यासाठी कुटुंबियांची धावाधाव; बीट अंमलदारांना सगळे माहिती, तरी गावागावात मिळते खुलेआम हातभट्टी

हातभट्टीमुळे पती भांडण करतोय, आई-वडिलांना शिवीगाळ करतोय, गावातील शांतता बिघडली आहे, गावात दारूबंदी होऊनही हातभट्टीची खुलेआम विक्री होत आहे. अशा प्रकारची निवेदने स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार पोलिस ठाण्यात दिली. मात्र, त्या गावातील दारूबंदी झालीच नाही, अशी व्यथा जिल्ह्यातील गावोगावच्या रहिवाशांची आहे.
liquor ban stirs strong public response.
liquor ban stirs strong public response.Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : हातभट्टीमुळे पती भांडण करतोय, आई-वडिलांना शिवीगाळ करतोय, गावातील शांतता बिघडली आहे, गावात दारूबंदी होऊनही हातभट्टीची खुलेआम विक्री होत आहे. अशा प्रकारची निवेदने स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार पोलिस ठाण्यात दिली. मात्र, त्या गावातील दारूबंदी झालीच नाही, अशी व्यथा जिल्ह्यातील गावोगावच्या रहिवाशांची आहे.

आई-वडिलाविना असलेल्या चिमुकल्याला त्याच्या आजीने सांभाळले. वयाच्या १७-१८ व्या वर्षांपासून तो नातू डांबरीकरणाच्या कामावर जाऊ लागला. आजीचे वय वाढत होते, नातूही मोठा झाला होता. जवळील नात्यातील मुलीशी त्याचा विवाह झाला. मदतीला आता त्याची पत्नीही आली होती. दोघेही नेटाने काम करीत होते. मात्र, त्याला गावातील हातभट्टीचे व्यसन लागले आणि आता दोघेही विभक्त आहेत. तो तरुण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातभट्टीच्या नशेत तर्रर्र असतो. ही व्यथा आहे सावळेश्वर (ता. मोहोळ) गावातील तरुणाची.

अनेक विवाहितांच्या कपाळाचे कुंकू काही वर्षांतच पुसले गेले, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुणांचे मृत्यू झाले. त्याचे कारण म्हणजे गावात सहजपणे मिळणाऱ्या हातभट्टीचे अतिसेवन आहे. याशिवाय अनेक तरुणांची पत्नी-पती दारूच्या व्यसनाला वैतागून माहेरी निघून गेल्या आहेत. सध्या गावात ना शांतता कमिटी, ना तंटामुक्त अभियान सुरू आहे. त्यामुळे गावातील भांडणे पोलिस ठाण्यापर्यंत जातात, मात्र, त्याठिकाणी फिर्यादी असो की गुन्ह्यातील संशयित आरोपी त्यांना येणारे अनुभव न सांगण्याजोगे आहेत.

दारू सोडण्यासाठी नाशिक, नगरला हेलपाटे

तरुणाचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून त्याची पत्नी, आई-वडील, भाऊ त्याला घेऊन नाशिक, नगर, हैदराबाद (कर्नाटक), अक्कलकोट अशा ठिकाणी हेलपाटे घालत आहेत. काहीजण देव-देवऋषी करत आहेत. मात्र, काही दिवस तरुण दारू सोडतात आणि पुन्हा व्यसनात बुडालेले दिसतात. हजारो रुपये खर्च करूनही गावातच सहज हातभट्टी मिळत असल्याने त्या तरुणांचे दारूचे व्यसन सुटत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

बीट अंमलदारांना सर्वकाही माहिती, तरीपण...

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ पोलिस ठाणे आहेत. त्याअंतर्गत साडेचार हजारांपर्यंत कर्मचारी आहेत. मोठ्या गावांसाठी बीट अंमलदार नेमलेले असतात, जेणेकरून त्या परिसरात शांतता, सुव्यवस्था टिकून राहावी, अवैध धंदे सुरू होऊ नयेत, असा त्यामागील हेतू आहे. बीट अंमलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्या गावात काय अवैध धंदा आहे, याची संपूर्ण माहिती असते. हे ‘ऑपरेशन परिवर्तन’साठी संकलित केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले होते. तरीपण, गावागावात हातभट्टी सुरू आहे हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com