जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यशस्वी झाल्याचेही फडणवीस म्हणाले. मराठवाड्यात आता जितक्‍या जागा मिळाल्या तितक्‍या आधी कधीच मिळाल्या नव्हत्या. आता मराठवाड्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई - नगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने भाजपवर विश्वास दाखवत कौल दिला आहे. या विश्‍वासाला कदापि तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज दिली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्‍कामोर्तब केले आहे. आमच्या प्रामाणिकतेवर लोकांनी विश्वास दाखविला आहे. या यशामुळे आता आमची जबाबदारी आणखीन वाढली असून, भविष्यात महाराष्ट्राचा अधिकाधिक विकास होईल यासाठीच आम्ही काम करत राहू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. कार्यकर्त्यांची मेहनत, पक्षाचे नियोजन आणि जनतेचा विश्वास यामुळेच हे यश मिळविणे शक्‍य झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या दोन अडीच वर्षांच्या कामांवर जनतेने विश्वास दाखविल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, ""ही निवडणूक म्हणजे राज्य सरकारच्या कामगिरीचाच कौल असणार असे चित्र माध्यमांतून दाखविण्यात आले होते. जनतेने आता आम्हाला सकारात्मक कौल दिला आहे. मराठा क्रांती मोर्चा, नोटाबंदी या निर्णयांचा भाजपला मोठा फटका बसेल, असे आडाखे काही जणांनी बांधले होते. मात्र जनतेने ते फोल ठरवले आहेत.''

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यशस्वी झाल्याचेही फडणवीस म्हणाले. मराठवाड्यात आता जितक्‍या जागा मिळाल्या तितक्‍या आधी कधीच मिळाल्या नव्हत्या. आता मराठवाड्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेसोबत युतीची तयारी - दानवे
शिवसेनेसोबत युती करण्याची भाजपची तयारी आहे. या निवडणुकीत युती झाली मात्र ती अगदी शेवटच्या क्षणी झाली. जिथे जिथे शक्‍य होईल तिथे युती करून निवडणुका करण्याची भाजपची तयारी आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी जी युती झाली ती केवळ या निवडणुकीपुरतीच होती. महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांसाठी युती करण्यासाठी शिवसेनेबरोबर चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

Web Title: Demonetisation will help BJP in UP too, says Maharashtra CM Devendra Fadnavis