कृषी विभाग म्हणतेय...शेतकऱ्यांनो, सोयाबीन बियाणे घरीच तयार करा 

संतोष सिरसट 
Thursday, 10 September 2020

गुणवत्तापूर्ण बियाणे तयार होते 
बियाणांची निर्मिती, काढणी आणि साठवणूक करताना योद्य ती काळजी घेतल्यास दर्जेदार, गुणत्तापूर्ण बियाणे तयार होते. अशाप्रकारचे बियाणे शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतो. 
रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 

सोलापूर ः राज्यात यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनच्या पेरणीमध्ये मोठी वाढ झाली. मात्र, पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या. काही सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हेही दाखल झाले. हा सगळा गोंधळ सोयाबीनच्या बाबतीत झाला आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीन बियाणे तयार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांवर राज्यभर गुन्हे दाखल केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथेही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पुडील वर्षी सोयाबीन बियाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या बियाणे न देण्याच्या मानसिकतेमध्ये आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी त्याचा खरिपाच्या पेरणीवर परिणाम होऊ नये म्हणून कृषी विभागाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पुढील वर्षीची तयारी शेतकऱ्यांनी आतापासूनच करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर 428.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची टक्केवारी 119.7 इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेराही वाढला आहे. 61 हजार 207 हेक्‍टर क्षेत्रावर त्याची पेरणी झाली आहे. याची टक्केवारी 162 इतकी आहे. यात बार्शी तालुक्‍यातील क्षेत्र 31 हजार 749 हेक्‍टर आहे. काही ठिकाणी बियाण्यांच्या तक्रारी आल्या असून यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी घरच्या घरीच बियाणे तयार करावे लागणार आहे. बियाण्यांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे शेतावरच तयार करता येणार आहे. याची प्रक्रियाही सोपी असल्याचे मत कृ,ी विभागाने व्यक्त केले आहे. 

बियाणे तयार करण्याची पद्धत 
ज्या शेतातील बियाणे तयार करणार आहोत तेथील तण, भेसळ, रोगट, शेंगा भरत असलेली झाडे काढावीत. कीड आणि रोगाचा बंदोबस्त करावा. शेंगा भरत असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे साठवणुकीमध्ये बुरशी वाढणार नाही. चारही बाजूला त्याच वाणाचे सोयाबीन असावे. नसेल तर ज्या बाजूला वाणाचे बियाणे नाही त्या बाजूला बांधापासून तीन मीटर आतपर्यंतची झाडे बियाणासाठी काढणीच्यावेळी घेऊ नयेत. कापणीनंतर पावसात भिजलेले बियाणे राखून ठेऊ नये. सोयाबीन पीक परिपक्व अवस्थेत असताना पाऊस आल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कायम राखण्यासाठी कापणीपूर्वी बाविस्टीन किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची फवारणी करावी. कापणीनंतर बियाण्यातील आर्द्रता 13-14 टक्के आणण्यासाठी एक ते दोन दिवस बियाणे उन्हात सुकवावे. उत्पादित बियाणांची आर्द्रता 14 टक्के असेल तर मळणी यंत्राचा वेग 400 ते 500 आरपीएम आणि 13 टक्के असेल तर वेग 300 ते 400 आरपीएम असावा. अन्यथा बियाणांमध्ये तांत्रिक नुकसान होऊ शकते. बियाणे वाळविताना मोठा ढीग न करता पातळ थरावर वाळवावे. साठवणूक करण्यापूर्वी बियाणातील आर्द्रता 9 ते 12 टक्के असेल याची काळजी घ्यावी. वाळलेले आणि स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारण 60 किलोपर्यंत बियाणे साठवावे. साठवणूक करतेवेळी एकावर एक थप्पी ठेवण्याऐवजी बियाणे वेगळे ठेवावे. जमिनीवर तरटे किंवा लाकडी फळ्यांचा वापर करून कोरड्या जागी साठवणूक करावी. पोत्याची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाणांची गुणवत्ता जास्त काळ टिकण्यास मदत होईल. आपल्या बियाणांची उगवणक्षमता तीनवेळा म्हणजे डिसेंबर, मार्च आणि जूनमध्ये चाचणी करूनच पेरणी करण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Department of Agriculture says ... Farmers, prepare soybean seeds at home