esakal | मानाच्या पालख्यांचे प्रस्थान; महापूजेसाठी मुख्यमंत्री आज पंढरपुरात
sakal

बोलून बातमी शोधा

मानाच्या पालख्यांचे प्रस्थान; महापूजेसाठी मुख्यमंत्री आज पंढरपुरात

कोरोनाच्या सावटामुळे प्रतिकात्मक होत असलेल्या आषाढीच्या सोहळ्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या दहा मानाच्या पालख्या २० बसमधून वाखरी येथे रवाना झाल्या आहेत.

मानाच्या पालख्यांचे प्रस्थान; महापूजेसाठी मुख्यमंत्री आज पंढरपुरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर- कोरोनाच्या सावटामुळे प्रतिकात्मक होत असलेल्या आषाढीच्या सोहळ्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या दहा मानाच्या पालख्या २० बसमधून वाखरी येथे रवाना झाल्या आहेत. आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत पंढरपुरात येणार आहेत.

कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रेचा सोहळा प्रतिकात्मक साजरा होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम महाराजांसह विविध नऊ संतांच्या पालख्या ठिकठिकाणाहून सोमवारी सकाळी पंढरपूरकडे बसमधून निघाल्या आहेत. प्रत्येक पालखीसाठी दोन बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमधून प्रत्येकी वीस या प्रमाणे चारशे मानकरी पादुकांच्यासह वाखरी येथे दुपारी तीनपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.

पंढरपूर येथील संत नामदेव मंदिरातून देखील दोन बसमधून मानकरी वाखरी येथे पोचतील. तिथे मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने वाखरी पालखी तळावर मानकऱ्यांचे सत्कार केले जाणार असून नंतर सर्व चारशेजण टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत इसबावी येथील विसावा मंदिरापर्यंत चालत येतील. तेथून पुढे मात्र प्रत्येक पालखीसोबत आलेले दोन वारकरी चालत पंढरपूरातील त्यांच्या मठांमध्ये जातील. उर्वरित मानकरी बसमधून पंढरपुरातील आपआपल्या मुक्कामाच्या मठांमध्ये जातील. या वेळी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेना सक्षमच!

महापूजा अन्‌ वारीसंदर्भातील ठळक बाबी...

- पंढरपूर व परिसरात संचारबंदी लागू; सोमवारी दुपारी तीनपर्यंत पंढरीत दाखल होणार मानाच्या पालख्या

- वाखरीत पालख्या दाखल झाल्यानंतर विसाव्यापर्यंत वारकरी चालत जाणार

- प्रत्येक पालखीसोबत ४० वारकरी असतील; पादुकासोबत दोघेच तर उर्वरित ३८ जण पालखीसोबत बसमधून जाणार

- पंढरीतील स्थानिक अंदाजित १०० वारकरी व फडकऱ्यांना वाखरीला न जाऊ देता नगरप्रक्षिणा करण्यास परवानगी

- महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबिय, मानाचे वारकरी दांम्पत्य, पुरोहित, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गाभाऱ्यात असतील

हेही वाचा: "एमपीएससी'चा 31 जुलैपर्यंत फेरनिकाल !

मुख्यमंत्री कुटुंबीयांसह येणार

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीयांसह आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात आगमन होणार आहे. मंगळवारी (ता. २०) पहाटे सव्वादोन वाजता मुख्यमंत्रीठाकरे व कुटुंबीयांचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात आगमन होईल. पहाटे दोन वाजून वीस मिनिटे ते तीन या वेळात श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन मध्ये श्री रुक्‍मिणी मातेची महापूजा होईल. श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या नवीन छायाचित्रांचे अनावरण आणि कान्होपात्रा वृक्षाचे रोपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.

loading image