उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आताच मदत नाही 

भारत नागणे
Saturday, 17 October 2020

केंद्राकडून 60 हजार कोटी येणे 
श्री. पवार म्हणाले, ""परतीच्या पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी मुंबईत राज्यातील नुकसानीची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरीव मदत करावी. राज्याचे जीएसटीचे तब्बल 60 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे आहेत.'' कोरोना महामारीच्या काळात देशाचे पंतप्रधान व्हीसीद्वारे देशाचा आढावा घेत आहेत. मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बिघडले कुठे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पाठराखण केली. 

पंढरपूर ः कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा राज्यावर पुराचे आणि अतिवृष्ठीचे अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्ज काढून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे सांगत अतिवृष्ठी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर करता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले. 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरातील कुंभार घाटाजवळ सहा जणांचा मृत्यु झाला आहे. याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आज पंढरपुरात आले होते. पाहणी नंतर श्री. पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यापुढे अनेक आर्थिक अडचणी असून केंद्र सरकारने जीएसटीचे 60 हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणीही पवार यांनी केली. यावेळी आमदार भारत भालके, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पंढरपुरात येण्यापूर्वी श्री. पवार यांनी तालुक्‍यातील पटवर्धन कुरोली, भोसे या ठिकणाच्या नुकसान झालेल्या पिकांची आणि रस्त्यांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जलयुक्त शिवारच्या कामाबाबत कॅगने ताशेरे ओढले आहेत. कॅग ही केंद्र सरकारची एजन्सी आहे. या कामाची चौकशी करण्यामागे कोणताही राजकीय आकस नाही. सिंचन घोटाळ्याचा विषय न्याय प्रविष्ट आहे. गेल्या सहा वर्षापासून याची चौकशी सुरु आहे, असे सांगत श्री. पवार यांनी ईडीच्या नोटीसीबाबत बोलण्यास नकार दिला. पंढरपूरात जवळपास एक हजार कोटींची विकासकामे झाली आहेत. मात्र ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सध्या सुरु असलेल्या घाटाचे काम देखील निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत पुणे येथे दोन तीन दिवसात आढावा बैठक घेवून माहिती घेणार असल्याने त्यांनी सांगितले. 

परिचारक कुुटुंबियांची घेतली भेट 
उपमुख्यमंत्री पवार यांनी आज माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी (कै.) परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. 
संपादन ः संतोष सिरसट 
  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar said that there is no help for the affected farmers now