solapur election
solapur
सोलापुरात उपमुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर! ‘या’ 7 नगरपरिषदांमध्ये 56 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष विजयी; पंढरपूर, मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष कोणाचे?
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदांपैकी एक-दोन ठिकाणी अपवाद वगळता सगळीकडेच भाजपची सत्ता येईल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगोला, दुधनी, मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. नगरपालिका निवडणुकीत ५६ जागा मिळवून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कुर्डुवाडीत नगराध्यक्ष निवडून आला असून या पक्षाला जिल्ह्यात एकूण २७ जागांवर यश मिळाले आहे.
अक्कलकोटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होऊनही मैंदर्गी व अक्कलकोट नगरपरिषदेत शिवसेनेला यश मिळाले नाही. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे चार आमदार आणि दोन्ही काँग्रेसचे दोन खासदार आहेत. पण, नगरपालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे नगरपालिकांच्या रणधुमाळीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते सोलापूर जिल्ह्यात फिरकले नाहीत. त्याचाही फटका उमेदवारांना बसला.
सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होऊनही शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी नगरपालिकांची सत्ता काबिज केली. याठिकाणी ‘शेकाप’ने जाहीर केलेले उमेदवार मारुती बनकर यांना ऐनवेळी पक्षात घेऊन भाजपने उमेदवारी दिली. त्या नाराजीचा फायदा शिवसेनेच्या आनंदा मानेंना झाला आणि ते नगराध्यक्ष झाले. कुर्डुवाडी नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष के.एन. भिसे यांची सून नगराध्यक्षासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवित होत्या. जिल्ह्यात त्यांच्या रुपाने या पक्षाचा एकमेव नगराध्यक्ष निवडून आला आहे.
दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक किती?
नगरपालिका उठाबा शिवसेना
बार्शी १९ ६
अकलूज २ --
अक्कलकोट -- १
दुधनी -- २०
सांगोला -- १५
करमाळा -- ५
कुर्डुवाडी ५ १
मोहोळ १ ८
एकूण २७ ५६
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्ह्यात करिष्मा
भाजपने १२ नगरपरिषदांमध्ये स्वत:चे उमेदवार उभे केले होते, पण चार ठिकाणीच यश मिळाले. त्यात पण अनगरमध्ये भाजपचे नव्हे तर माजी आमदार राजन पाटलांचे यश आहे. बार्शीत शिवसेना भाजपसोबत होती. याउलट शिवसेनेला मोहोळ, सांगोला, दुधनीत यश मिळाले. याशिवाय पंढरपूर, मंगळवेढ्यातही विजयी उमेदवारांना आमचीच साथ होती. नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्मा पहायला मिळाला.
- अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
पंढरपूर, मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष कोणाचे?
पंढरपूर नगरपरिषदेत प्रणिता भालके यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली. दुसरीकडे मंगळवेढा नगरपरिषदेत सुनंदा आवताडे यांनीही विजय मिळवला. नगराध्यक्ष झालेले दोन्ही उमेदवार तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे आहेत. त्या दोन्ही उमेदवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मदत केल्याचे त्यांचे जिल्हाप्रमुख सांगतात. आता दोन्ही नगराध्यक्ष नेमके कोणत्या पक्षात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

