फडणवीसांची डोकेदुखी वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 December 2019

म्हणून पक्षांतर्गत वाद
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजपमधील बहुजन आणि ओबीसी नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आघाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीत तर खडसे यांच्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश महेता, राज पुरोहित अशा मुंडे समर्थक नेत्यांची तिकिटे कापल्याने पक्षातील असंतोष वाढला आहे. मागील निवडणुकीत तर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांना जाणीपूर्वक पाडल्याची चर्चा सुरू झाल्याने ही खदखद उफाळून आली आहे.

मुंबई - भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १०५ जागा जिंकलेल्या भाजपला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा केलेले सत्तास्थापनेचे प्रयत्न दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने हाणून पाडले असले, तरी काही महिन्यांतच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिले होते. मात्र भविष्यात फडणवीस यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे वातावरण भाजपमध्येच तयार होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेले आयाराम गयाराम बेचैन झाले आहेत. अनेक नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याचा मनोदय व्यक्‍त केल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अडचणीच्या काळात साथ दिलेल्या आमदारांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यांनी ‘या’ नेत्यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत घेण्याचा अजून निर्णय झालेला नाही; परंतु पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या हितासाठी त्यांचा काही उपयोग होत असेल तर भविष्यात त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
- नवाब मलिक, प्रवक्‍ते, राष्ट्रवादी काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devend fadnavis problem increase in politics