esakal | अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'
sakal

बोलून बातमी शोधा

amruta fadnavis tweet about shiv sena aurangabad tree cutting

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : शिवसेनेनं सत्तेवर येतात मुंबईतील आरे कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली. आरेच्या जंगलातील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पण, औरंगाबादमधील एका वृक्षतोडीचा संदर्भ देत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केलीय. अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवसेना कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच एक राजकीय ट्विट केले आहे. त्यामुळं सध्या त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
वृक्षतोड ही तुमच्या सोयीनुसार स्वीकरली जाते किंवा जेव्हा तुम्हाला कमिशन मिळते तेव्हा ती वृक्षतोड तुम्हाला मान्य असते. हे अक्षम्य पाप आहे. अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय. ढोंगीपणा हा रोग आहे. लवकर बरे व्हा, असा टोलाही अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राचं कात्रण पोस्ट केलंय. त्यात औरंगाबादमध्ये एक हजार झाडं कापली जावीत, अशी शिवसेनेची इच्छा असल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळं शिवसेना अडचणीत आली आहे. शिवसेनेला या टीकेला उत्तर द्यावं लागणार आहे. जर वृक्षतोडीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा विषय असले तर, शिवसेनेला औरंगाबादमधील स्मारकाचं काम थांबवावं लागणार असल्याचं बोललं जातय. शिवसेना आता यावर काय निर्णय घेते हे पहावं लागणार आहे. 

काय आहे प्रकरण?
औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेनं आरे कॉलनीतील वृक्षतोडीचा संदर्भ देत मुंबई मेट्रोच्या कारशेडचं आरेतील काम थांबवलंय. त्याचवेळी शिवसेनेचीच सत्ता असलेल्या शहरात एक हजार झाडं तोडण्याची तयारी करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात प्रियदर्शनी पार्कमध्ये महापालिकेच्या वतीनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ही वृक्षतोड करण्यात येणार असल्याचं संबंधित इंग्रजी वृत्तपत्रानं म्हटलंय.