esakal | ...तर कारवाई करा, फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

पिकविम्याचे मिळत नसतील तर कारवाई करा, फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला झोडपून काढले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी शिरले आहे. याच नुकासानीची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) आणि प्रविण दरेकर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर (fadnavis marathwada visit) आहेत. त्यांनी हिंगोलीतील आडगाव येथे अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

हेही वाचा: 'विरोधी पक्षनेत्यांचा रोख आमच्याकडे, तर आमचा रोख केंद्राकडे'

आडगाव येथील शेतकऱ्यांनी पिकविम्याचे पैसे मिळत नाही. आमची पिकविम्यासाठी नोंद केली जात नाही. नुकसानीची पाहणी केली जात नाही. साहेब...काहीतरी करा, अशा व्यथा फडणवीसांसमोर मांडल्या. त्यावेळी आडगावचे तलाठी देखील त्याठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी फडणवीसांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आमच्या सरकारच्या काळात आम्ही पिकविम्याचे कोट्यवधी रुपये दिले. आता कंपन्या पिकविम्याचे पैसे का देत नाहीत? कंपन्या पैसे देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशी कडक शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

मराठवाडा येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने सरसकट नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमुक्त करण्याची गरज आहे. आमच्या सरकारच्या काळात पूरपरिस्थिती आली, त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. पण, आताचे सरकार नुसते दौरे करत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार केंद्राकडे बोट दाखवत आहे. पण, केंद्र सरकार मदत करतच आहे. राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भाला नेहमी दुर्लक्षित केले आहे. यासाठी विशेष अधिवेशनाची मागणी करायची तरी कोणाकडे? हा प्रश्न आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मराठवाड्यात पावसाने सर्वाधिक नुकसान केले आहे. त्याचे पंचनामे झाल्याशिवाय मदत देता येणार नाही. आधी सर्व पंचनामे करू आणि नंतरच मदत घोषित करू, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने देखील पुढे यावे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

loading image
go to top